सावनी शेंडे, कार्तिकी गायकवाड यांच्या गायनाची डोंबिवलीकरांना मिळणार मेजवानी
आषाढी वारी सोहळ्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आधारित काही गाणी वर्षा हुंजे यांनी लिहिली आहेत, ती ही यात सादर होणार आहेत. शिवाय यातील काही गाण्यांवर नृत्याविष्कारही सादर केले जाणार आहेत.
डोंबिवली : यंदाचा आषाढीवारी सोहळा १० जून रोजी सुरु होतोय. त्याच पार्श्वभूमीवर रविवार ३० एप्रिल रोजी डोंबिवलीत आषाढीवारी सोहळ्यावर आधारित ‘कैवल्यवारी’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पं. आनंद भाटे, सावनी शेंडे, कार्तिकी गायकवाड, अवधूत गांधी, विलास कुलकर्णी असे दिग्गज गायक सहभागी आपली गायन सेवा सादर करणार आहेत.
आषाढी वारी सोहळ्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आधारित काही गाणी वर्षा हुंजे यांनी लिहिली आहेत, ती ही यात सादर होणार आहेत. शिवाय यातील काही गाण्यांवर नृत्याविष्कारही सादर केले जाणार आहेत.
आषाढीवारी सोहळ्यात माऊलींचे आळंदीतून होणारे प्रस्थान, देहूतून जगद्गुरू तुकोबारायांचे प्रस्थान झाल्यानंतर अनगड शाह बाबांच्या दर्ग्यावर होणारी आरती, दिवेघाटच वर्णन, जेजुरीत होणारे शैव आणि वैष्णवांचे मिलन, धावा, बंधुभेट, रिंगण आणि पंढरपुरातून विठूरायाचं दर्शन घेऊन परत जातानाची वारकऱ्याची भावना अशा वेगवेगळ्या गीतांचा समावेश आहे.
याच गीतांवर आधारित आषाढीवारी सोहळ्यापर्यंत महाराष्ट्रात ‘कैवल्यवारी’ या कार्यक्रमाचे ११ प्रयोग करण्याचे नियोजन असल्याचे वायर्ड एक्सप्रेशन आणि श्रिया क्रिएशन या संस्थेने सांगितले आहे.