Neelam Gorhe : मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही, हे आई तुळजा भवानीला विचारेन; उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी नीलम गोऱ्हेंचा राज्य सरकारला टोला
मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही हे आई तुळजाभवानीला विचारेन, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यानिमित्ताने लगावला आहे.
मुंबई : आई तुळजाभवनीला नवस बोलला होता, चांदीची पावले देईन म्हणून. आज उद्धव साहेब (Uddhav Thackeray) आणि रश्मी वहिनी यांना दाखवल्या. त्यांनी नमस्कार केला. उद्धव साहेबांसोबत आतमध्ये चर्चा झाली. ते उत्साही दिसत आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही हे आई तुळजाभवानीला विचारेन, असे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण त्यांच्यासोबत कोण आहे हे समजेल, असा टोला त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून जाणाऱ्या बंडखोरांना लगावला आहे. तर अशा काळात आम्ही उद्धव साहेबांसोबत आहोत. सर्वांच्या साथीने पक्ष वाढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
‘त्यांना काय लिहायचे ते लिहू द्या’
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख नाही. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, की त्यांना काय लिहायचे ते लिहू द्या. शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महत्त्वाचे आहे. काही काही जण टीकेची फुले वाहतात, त्यात निवडुंगाची फुले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
‘…हे त्यांनी लक्षात ठेवावे”
स्मिता ठाकरे यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावर त्या म्हणाल्या, की कोणाला भेटायचे कोणाला नाही, हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. मात्र त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आहेत, हे लक्षात ठेवून पुढे वागावे, असे त्या म्हणाल्या.
‘मंत्रिमंडळ विस्तार कधी?’
मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही हे आई तुळजाभवानीला विचारेन, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यानिमित्ताने लगावला आहे. आज महिला अत्याचार वाढले आहेत. राज्यात पूरपरिस्थिती आहे. मंत्रिमंडळ नाही, मंत्री नाहीत, पालकमंत्री नाहीत. अशा स्थितीत गृहमंत्री, कृषिमंत्री असणे गरजेचे आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.