कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तातडीने कारवाई करा, डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश
कर्नाळा सहकारी बँकेत अनेक शेतकरी बांधवांच्या ठेवी आहेत. या ठेवीदारांचं हित लक्षात घेऊन बँकेच्या कामकाजात झालेल्या गैरव्यवहारावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
मुंबई : कर्नाळा सहकारी बँकेत अनेक शेतकरी बांधवांच्या ठेवी आहेत. या ठेवीदारांचं हित लक्षात घेऊन बँकेच्या कामकाजात झालेल्या गैरव्यवहारावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज (15 जानेवारी) दिले. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाळा सहकारी बँक ठेवी धारकांना न्याय देणे, अवैध खासगी सावकारीवर नियंत्रण, ग्रामीण भागातील शेतीमालाचे गोदाम बांधकामाबाबत सहकारी बँक आणि सहकार विभागाची भूमिका या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली (Neelam Gorhe demand to action in Karnala Cooperative Bank Fraud).
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “या बँकेच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याने ठेवीदार अडचणीत आले आहेत. या ठेवीदारांना संरक्षण देणे महत्वाचे आहे. त्यांचे हित लक्षात घेऊन बँकेवर तातडीने कारवाई करावी आणि या ठेवीदारांच्या ठेवी परत कशा देता येतील यासाठी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणाला गती द्यावी. तसेच याची चौकशी वेळेत पूर्ण करून कारवाई करावी.”
“या बँकेचे इतर बँकेत विलिनीकरण करून या ठेवीदारांना तातडीने न्याय देता येईल का यासबंधी सहकार विभागाने विचार करून प्रस्ताव तयार करावा. यासाठी काही लोकप्रतिनिधीची मदत लागली तर त्याचाही विचार करावा. राज्यात सहकार विभागांतर्गत असलेले प्रलंबित प्रकरणे तातडीने सोडवावीत. यासाठी ज्या जिल्ह्यात प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक आहे तिथे फिरते न्यायालय किंवा जिल्ह्यात तात्पुरते न्यायालयामार्फत प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचा विचार करावा, अशा सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केल्या.
“शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास तातडीने संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करा”
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “याबाबत विधी व न्याय विभागाशी चर्चा करून यावर निर्णय घ्यावा. बँक, पतसंस्था, खासगी सावकारी यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर त्यांना तातडीने सहकार विभागांशी संपर्क साधता यावा. यासाठी सहकार विभागाने हेल्पलाईन नंबर आणि व्हॉट्सअॅप नंबर सुद्धा जाहीर करावा. त्यामुळे शेतकरी आणि ठेवीदारांना वेळीच मदत होईल.”
सहकार विभागाचे प्रधान सचिन अरविंदकुमार म्हणाले, “या बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करून शेतकऱ्यांना आणि ठेवीदारांना दिलासा देण्यात येईल. तसेच राज्यातील ज्या बँकेचे अनियमित व्यवहार झाले आहेत त्या सर्व बँकेचे मागील 5 वर्षातील लेखा परिक्षणाचे अहवाल तपासून दोषींवर कारवाई करण्यात येईल.”
या बैठकीला साखर आयुक्त अनिल कवडे, कृषी व पणन संचालक सतिश सोनी, अतिरिक्त महासंचालक राजेंद्र सिंग, पोलीस विशेष महानिरीक्षक सीआयडी रंजन शर्मा, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी अरुण इंगळे, कांतीलाल कडू, अॅड. निलेश हेलोंडे तसेच सहकार, पोलीस विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
महिलांवरील असत्याचार रोखण्यासाठी तात्काळ ”शक्ती कायद्यास” चालना देण्याची गरज – नीलम गोऱ्हे
“अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका, ही तर भाजपची केविलवाणी धडपड”
व्हिडीओ पाहा :
Neelam Gorhe demand to action in Karnala Cooperative Bank Fraud