घाटकोपरमध्ये सैराट, जन्मदात्या पित्याकडून मुलीची निर्घृण हत्या
प्रेम विवाह केल्याच्या रागात बापानेच आपल्या गरोदर असलेल्या मुलीची हत्या केल्याची घटना काल (14 जुलै) घाटकोपरच्या नारायणनगर भागात उघडकीस आली. मीनाक्षी चौरसिया (20) असे या मृत मुलीचे नाव आहे.
घाटकोपर : नात्याला काळिमा फासणारी एक घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. प्रेम विवाह केल्याच्या रागात बापानेच आपल्या गरोदर असलेल्या मुलीची हत्या केल्याची घटना काल (14 जुलै) घाटकोपरच्या नारायणनगर भागात उघडकीस आली. मीनाक्षी चौरसिया (20) असे या मृत मुलीचे नाव आहे.
घाटकोपरच्या नारायण नगरच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर काल (14 जुलै) सकाळी 7 च्या सुमारास एक महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर मृत महिलेचे नाव मिनाक्षी असून ती नारायण नगर परिसरात राहत असल्याचे पोलिसांना चौकशीदरम्यान समजले. मात्र तिची हत्या कधी आणि कोणी का केली याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांना तिच्या नातेवाईंकावर संशय होता. या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानुसार पोलिसांनी मीनाक्षीची हत्या तिच्या जन्मदात्या बापानेच केल्याचे उघडकीस आले.
नेमकं काय घडलं ?
मीनाक्षीच्या वडिलांनी तिचे एका मुलासोबत लग्न ठरवले होते. मात्र तिने या लग्नाला नकार देत ती घरातून पळून गेली. यानंतर मीनाक्षीने ब्रिजेश चौरसिया या मुलासोबत प्रेमप्रकरण असल्याने त्या दोघांनी गेल्यावर्षी प्रेमविवाह केला. ब्रिजेशचे पानाचे दुकान आहे. या दोघांच्या लग्नाला मिनाक्षीच्या वडिलांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे त्या दोघांनी पळून जाऊन वयात आल्यावर लग्न केले.
लग्नानंतर काही महिन्यांनी मीनाक्षीच्या वडील आणि सासरच्यांचे संबंध सुधारले होते. मात्र मुलीच्या प्रेमविवाहाचा राग डोक्यात ठेवून काल तिच्या वडीलांनी पैसे आणि कपडे देतो या बहाण्याने तिला काल घराबाहेर बोलवले. मीनाक्षी घराबाहेर येताच तीक्ष्ण हत्याराने तिच्या पोटावर निघृणपणे वार केले.
मीनाक्षीच्या हत्येनंतर शवविच्छेदनात ती गरोदर असल्याचे उघड झाले. दरम्यान यानंतर पोटच्या मुलीची हत्या करुन बापाच्या नात्यावर काळिमा फासणाऱ्या या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर कायद्याने शिक्षा ही होईल मात्र यामुळे लोकांच्या मानसिकतेत बदलेल का अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.