ये है मुंबई मेरी जान ! सौंदर्यीकरण, नव्या सुविधांसह करा चौपाट्यांवर मनमुराद पर्यटन, पहा काय होतोय बदल?
अन्य देशातील आकर्षक चौपाट्या तेथील नागरिकांना भुरळ घालत असतात. मात्र त्या तुलनेत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चौपाट्यांची हवी तशी सुधारणा करण्यात आलेली नाही.
मुंबई : मुंबईत येणाऱ्या देश विदेशातील पयर्टकांना येथील चौपाट्यांचे विशेष आकर्षण असते. प्रत्येक पर्यटक गिरगाव चौपाटीसह दादर, जुहू, सात बंगला, वेसावे, गोराई, मढ, मार्वे या चौपाट्यांवर जाऊन समुद्राचा आनंद मनमुराद लुटत असतात. मात्र, या पर्यटकांना अनेक गैरसुविधांना सामोरे जावे लागते. मुंबईत येणाऱ्या या पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांना पर्यटनाचा आनंद घेता यासाठी यासाठी महापालिकेने या चौपाट्या चकाचक करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील या चौपाट्यावर सुविधा देतानाच त्या अधिक आकर्षक करून त्यांच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यात येणार आहे.
अन्य देशातील आकर्षक चौपाट्या तेथील नागरिकांना भुरळ घालत असतात. मात्र त्या तुलनेत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चौपाट्यांची हवी तशी सुधारणा करण्यात आलेली नाही. मुंबईत राणी बाग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह यासह विविध प्रेक्षणीय स्थळे आणि चौपाट्या येथील अस्वच्छता, गलिच्छपणा याबाबत पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबईतील सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी मुंबईच्या सौंदर्यकरणासाठी आराखडा तयार केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जुहू चौपाटीचा कायापालट करण्यात येणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, प्लास्टिकमुक्त परिसर, नैसर्गिक विस्तीर्ण वाळू, पर्यटकांना बसण्यासाठी जागा, मुलांना आकर्षण ठरणारी खेळणी, ग्राफिक वॉल, सेल्फी पॉइंट, चौपाटी परिसरात ग्रॅनाइटचे पदपथ, हिरवीगार शोभिवंत झाडे लावून परिसर सुशोभित केला जाणार आहे. यासाठी ६ कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ दादर, सात बंगला, वेसावे ,गोराई, मढ, मार्वे आदी चौपाट्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून यासाठी अंदाजे 30 कोटी इतका खर्च येणार आहे.
मुंबईतील या सर्व चौपाट्यांवर स्वच्छतेसाठी ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवल्या जाणार आहेत. तर, नैसर्गिक वेलींनी तयार केलेले आणि एलईडी दिव्यांनी चमकणारे खांब बसवण्यात येणार आहेत. चौपाटी परिसरात संरक्षक भिंती उभारून त्यावर सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारी रेखाचित्रे साकारण्यात येणार आहेत. चौपाटीवर पहिल्यांदाच ग्राफिक वॉल तयार करण्यात येणार असून दिवसभरात सुर्याच्या भ्रमणाप्रमाणे बदलणारी ग्राफिक्स येथे पाहता येणार आहे. तर, पदपथावर ‘फ्लोअर माँनिटरिंग लाईट’ लावण्यात येणार असल्यामुळे आता या मुंबईच्या चौपाट्या अधिकच चकाचक होणार आहेत.