मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) दोन दिवसांसाठी ईडीचा ताबा मागत आहेत, जसे काही दोन हजार रुपये मागत आहेत, असा टोला भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. दोन दिवस ईडीचा ताबा द्या, देवेंद्र फडणवीससुद्धा शिवसेनेला मत देतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ही टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ईडीच्या गैरवापरावरून राज्यात महाविकास आघाडी सरकार सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहे. त्यात संजय राऊत यांनी राज्यसभेच्या पराभवानंतर आपला संताप ईडीवर (Enforcement Directorate) टीका करून केला होता. यावेळी निलेश राणे यांनी संजय राऊत यांनी भिक मागणे बरे नाही, असा टोलाही लगावला आहे.
राज्यसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यात महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेचे एक मतही बाद करण्यात आले. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी तर ईडीच्या गैरवापरावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. रविवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, की 48 तासांसाठी ईडी आमच्या हातात द्या. नंतर देवेंद्र फडणवीसदेखील शिवसेनेला मते देतील. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून भाजपा नेते आता संतापले आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात निलेश राणे यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना डिवचणारे ट्विट केले आहे. संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. संजय राऊत ईडी मागत आहेत, 200 रुपये मागत असल्यासारखे… अशी भीक मागणे बरे नाही, असे निलेश राणे म्हणाले.
संज्या राऊत दोन दिवसासाठी ईडी मागतोय जसा 2 हजार उदार मागतोय/… अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 12, 2022
राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय पवार लढले. त्यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला. दोघेही कोल्हापूरचे. मात्र संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. दोघामध्येही जोरदार लढत झाली. संजय पवार विजयी होतील, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र घडले उलटे. संख्याबळ पुरेसे असूनही पवार यांचा पराभव झाला. तर अपक्षांची मते भाजपाने फोडल्याने त्याचा फायदा त्यांना झाला.