Nilesh Rane : ‘आता शिवसेना नाही, ”शिल्लक” सेना! लवकरच बाजार उठणार म्हणत निलेश राणेंचा शिवसेनेवर ‘बाण’
स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा, शिवसेनेच्या बापाच्या नावाने नाही, असे संजय राऊत यांनी बंडखोरांना ठणकावून सांगितले होते. यावरूनही निलेश राणे यांनी समाचार घेतला होता. उद्धव आणि आदित्य यांच्यावर टीका केली होती.
मुंबई – शिवसेनेत बंड उफाळून आले आणि महाविकास आघाडीला हादरा बसला. आता यावरून भाजपा महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि विशेषत: शिवसेनेवर टीका करत आहे. शिवसेनेचे विरोधक असलेले राणेदेखील सध्या उद्धव ठाकरे आणि सेनेवर तोंडसुख घेत आहेत. एक ट्विट करत निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत आपल्यासोबत आमदार नेले. त्यांच्याकडे 37हून अधिक आमदार असल्याचे सांगितले जात आहे. असा दावादेखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून केला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षात मात्र त्या तुलनेत अगदीच कमी आकडा आहे. कोण शिवसेनेत आहे आणि कोण शिंदे गटात हे विधानसभेतच कळणार आहे. मात्र यावरून भाजपा शिवसेनेला लक्ष्य करत असल्याचे दिसत आहे.
‘शिवसेनेचे नाव बदला’
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांच्यासोबत आता इतके आमदार गेले आहे. त्यामुळे 55 पैकी 40पेक्षा अधिक आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. राहिलेलेही एक एक येत आहेत. त्यामुळे शिवसेनेने आपले नाव बदलून शिल्लक सेना असे करावे, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.
एकनाथजी शिंदें सोबत इतके आमदार निघून गेले आहेत की उद्धव ठाकरेंनी आता स्वतःच्या गटाचं नाव “शिवसेना” ऐवजी
“शिल्लक सेना” करून घ्यावं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 27, 2022
बापावरून एकमेकांवर चिखलफेक
स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा, शिवसेनेच्या बापाच्या नावाने नाही, असे संजय राऊत यांनी बंडखोरांना ठणकावून सांगितले होते. यावरूनही निलेश राणे यांनी समाचार घेतला होता. उद्धव आणि आदित्य यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते, की बापाच्या नावाने मते मागण्याचा सल्ला आदित्य ठाकरे यांनाही द्यावा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
‘हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मत मागा.’ – उद्धव ठाकरे
हे आदित्य ला पण सांगा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 26, 2022
‘त्यांच्यामुळेच तुम्ही खुर्चीवर’
ज्या बंडखोरांना शिवसेना लक्ष्य करत आहे, त्यांच्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले आहात. तीस तीस वर्ष त्यांनी पक्षात काम केले आहे. त्यांना घाण म्हणण्याचा नीचपणा पेंग्विन सेनेने केला आहे. तुमचा बाजार लवकरच उठणार, असा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला आहे.