Nitesh Rane : बाळासाहेब हिंदुत्वाचे बाप, तुम्ही अडीच वर्षात शिवसैनिकांसाठी काय केलं? नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अलिकडच्या काळात नारायण राणे भाजपमध्ये गेल्यापासून या संघर्षाला आणखी धार आली आहे. बाळासाहेब हे हिदुत्वाचे बाप आहेत हे आम्हाला माहिती आहे, मात्र तुम्ही सेक्युलरांचे जे बाप आहेत त्यांच्या कुशीत जाऊन सत्तेसाठी धोका दिला, असा हल्लाबोल आज नितेश राणे यांनी चढवला आहे.
मुंबई : आजच मुंबईत वेस्टीन हॉटेलमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन (Shivsena Wardhapan Din) पार पडला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी (Cm Uddhav Thackeray) हिंदुत्वावरून तसेच विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर चौफेर बॅटिंग केली आहे. त्यानंतर आता भाजप नेत्यांकडूनही मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आज मुख्यमंत्र्यांचं भाषण झालंय आणि त्यावर राणेंची प्रतिक्रिया येणार नाही, असं कसं होईल? मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खरपूस टीका करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही तिखट सवाल केले आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासूनच राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष महाराष्ट्राला पायला मिळाला आहे. हा वाद अगदी जेलपर्यंतही गेला आहे. अलिकडच्या काळात नारायण राणे भाजपमध्ये गेल्यापासून या संघर्षाला आणखी धार आली आहे. बाळासाहेब हे हिदुत्वाचे बाप आहेत हे आम्हाला माहिती आहे, मात्र तुम्ही सेक्युलरांचे जे बाप आहेत त्यांच्या कुशीत जाऊन सत्तेसाठी धोका दिला, असा हल्लाबोल आज नितेश राणे यांनी चढवला आहे.
तुम्ही शिवसैनिकांसाठी काय केलं?
शिवसेने सत्तेसाठी हिंदूत्व सोडल्याची टीका ही वारंवार भाजपकडून होत आहे, आजची शिवसेना शिवसैनिकांची राहिली आहे कां? बाळासाहेबांची किंवा आनंद दिघे साहेबांची राहिली आहे का? असे अनेक सवाल नितेश राणे यांनी केली आहेत. तसेच ही जर बाळासाहेबांची असती तर आजच्या कार्यक्रमाची सुरूवात ही अनिल देसाई नाही तर एकनाथ शिंदे यांनी केली असती. मात्र शिवसेनेचे खासदार हे मोदीसाहेबांचा फोटो लावून निवडून आले आहेत. तुमच्या वैयक्तिक कामसाठी आणि मेव्हण्याला वाचवायला मोदी सरकार लागतं, तर अडीच वर्षात तुम्ही शिवसैनिकांसाठी काय केल? असा सवालही राणे यांनी केला आहे.
येत्या निवडणुकीत तुम्हाला उत्तर मिळेल
तसेच शिवसेनेच्या आत्ताच्या 56 आमदारांमध्ये आदित्यसेनेचे आमदार कितपत यांच्यासोबत राहतील? बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला हे सरकार आधीपासूनच मान्य नव्हतं, तर बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकाला अडीच वर्षात काय स्थान दिल ते सांगा, असेही नितेश राणे म्हणाले आहेत. आज तुम्हाला आईच्या दुधाची भाषा करावी लागतेय कारण आज शिवसैनिक काय खात आहे, काय करत आहेत, हे कधी पाहिलचं नाही. त्यामुळे आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक याला उद्याच्या निवडणूकीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा राणे विरुद्ध ठाकरे सामना रंगला आहे.