15 दिवसात मुंबईतील कराची बेकरीचं नाव बदला, नितीन नांदगावकरांचा इशारा

| Updated on: Nov 19, 2020 | 5:55 PM

कराची बेकरी, कराची स्वीट, कराची स्कूल असे नाव मुंबईत चालणार नाहीत. पुढच्या 15 दिवसात कराची नावाच्या पाट्या बदला, असा इशारा नितीन नांदगावकर यांनी दिला आहे (Nitin Nandgaonkar appeal to Karachi Sweets shop owner to change shop name)

15 दिवसात मुंबईतील कराची बेकरीचं नाव बदला, नितीन नांदगावकरांचा इशारा
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी वांद्र्यातील कराची स्वीट्स या दुकानाचं नाव बदलण्याची मागणी केली. नितीन नांदगावकरांच्या या मागणीनंतर कराची स्वीट्सचं नाव पेपरने झाकण्यात आलं आहे. नितीन नांदगावकर यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरदेखील याबाबत माहिती दिली आहे. “कराची बेकरी, कराची स्वीट, कराची स्कूल असे नाव मुंबईत चालणार नाहीत. पुढच्या 15 दिवसात कराची नावाच्या पाट्या बदला”, असा इशारा नितीन नांदगावकर यांनी दिला आहे (Nitin Nandgaonkar appeal to Karachi Sweets shop owner to change shop name)

नितीन नांदगवाकर यांनी याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मला कराची या नावाबद्दल आक्षेप आहे. एकीकडे भाऊबीज होते आणि दुसरीकडे आपला जवान शहीद होतो. त्या पाकिस्तानच्या कराचीचे नाव दुकानाला असेल तर मनाला वेदना होतात. या वेदना असह्य आहेत. तुम्हाला वाटत असेल तुमच्या भावना असतील तर कराची नाव तुमच्या हृदयात ठेवा. त्याचे प्रदर्शन नको”, अशी प्रतिक्रिया नितीन नांदगावकर यांनी दिली.

“दिवाळी निमित्त मिठाई घेण्यासाठी दुकानात गेलो होतो. माझ्या खास कार्यकर्त्याचा वाढदिवससुद्धा होता. त्यावेळी कराची स्वीट्सचे दुकान दिसलं. मी चौकशी केली की हे दुकान कुणाचं आहे? दुकानाचे नाव कराची का? त्या मालकाने सांगितलं, फाळणीवेळी आम्ही इथे आलो. या नावासोबत आमच्या भावना आहेत. मग भारताबद्दल भावना किंवा अभिमान नाही का? असं मी त्यांना विचारलं. त्यावर मालक म्हणाले, आहेत ना! मी म्हटलं, तुम्हाला मुंबईने मोठं केलं. पण त्यांचे गुणगाण गाणार तर नाही चालणार? पहिले आपला देश”, असं नांदगावकर यांनी सांगितलं.

“जो प्रदेश अतिरेक्यांचा अड्डा आहे त्याच्या नावाने तुम्ही दुकानाच्या पाट्या लावणार असाल तर कसं सहन करणार? मी आज बघितलं, मला नाही पटलं. मी हात जोडून विनंती केली. त्यांनी सांगितले की, नावात बदल करू”, असं नितीन नांदगावकर म्हणाले (Nitin Nandgaonkar appeal to Karachi Sweets shop owner to change shop name).

“मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. महाराष्ट्र, मुंबई ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मला वाटलं म्हणून मी ते केलं. ज्या ज्या वेळी चुकीची घटना घडते त्याला विरोध झाला पाहिजे. याआधी विरोध का नाही झाला मला माहित नाही. मला काल दिसलं मी विरोध केला. ती उस्फुर्त प्रतिक्रिया होती”, असं नांदगावकर यांनी सांगितलं.

“मी दुकानदाराला 15 दिवसांचा वेळ दिला आहे. पण ते दोन ते तीन दिवसात करतील. कायदेशीर प्रक्रिया करायला वेळ लागतो, याची मला कल्पना आहे. मनसनेही हा मुद्दा घेतला, चांगलं आहे. स्वागत आहे. सगळ्या प्रॉपर्टी ज्यांना कराची नाव असेल तर त्यांना सांगायचे आहे की पहिला आपला देश. अतिरेक्यांचा अड्डा असलेल्या कराचीचे नाव आपल्याकडे नको, इतकं साधं सांगणं आहे”, अशी भूमिका नितीन नांदगावकर यांनी मांडली.

कराची नाव बदला, ही शिवसेनेची भूमिका नाही : संजय राऊत

दरम्यान, कराची नाव बदला ही भूमिका शिवसेनेची नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर स्पष्ट केलं आहे. “कराची बेकरी आणि कराची स्वीट्स या गेल्या 60 वर्षांपासून मुंबईत आहेत. त्यांचा पाकिस्तानाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात काहीच अर्थ नाही. कराची नाव बदला ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही”, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

संबंधित व्हिडीओ :