नवी मुंबईत ट्रेनची बसला धडक, लोकल वेळीच थांबल्याने दुर्घटना टळली
नवी मुंबई : रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना नवी मुंबईत मोठी दुर्घटना टळली. सानपाडा कारशेड आणि जुईनगर दरम्यान शटिंग करत असताना रिकाम्या ट्रेनने नवी मुंबई महापालिका परिवहन मंडळाच्या (एनएमएमटी) बसला धडक दिली. मोटारमनने वेळीच ब्रेक मारल्याने मोठी दुर्घटना टळली. जखमी झालेल्या तीन प्रवाशांवर डीवाय पाटील रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि त्यांना काही वेळातच डिस्चार्ज देण्यात आला. […]
नवी मुंबई : रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना नवी मुंबईत मोठी दुर्घटना टळली. सानपाडा कारशेड आणि जुईनगर दरम्यान शटिंग करत असताना रिकाम्या ट्रेनने नवी मुंबई महापालिका परिवहन मंडळाच्या (एनएमएमटी) बसला धडक दिली. मोटारमनने वेळीच ब्रेक मारल्याने मोठी दुर्घटना टळली. जखमी झालेल्या तीन प्रवाशांवर डीवाय पाटील रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि त्यांना काही वेळातच डिस्चार्ज देण्यात आला.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कारशेड आणि जुईनगर दरम्यानच्या आवारात रस्ता ओलांडणे अनधिकृत आहे. रेल्वेकडून मंजूरी न घेता सिडकोने रस्ता बांधला आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून रोड ओवर ब्रीज (आरओबी) तयार करण्यासाठी रेल्वे प्रशासन एनएमएमसी आणि सिडको यांना आग्रह करत असल्याचं म्हणत रेल्वेने हात झटकले.
दरम्यान, या घटनेत बसचालकाची चूक आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. रोहित गायकरला नेरुळ पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली. क्रॉसिंगवर फ्लॅगमॅनने लालझेंडा दाखवला आणि शिट्टी वाजवून बसला थांबवण्याची सूचनाही केली. मात्र चालकाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि बस तशीच पुढे नेली, असं आरपीएफने केलेल्या चौकशीतून समोर आल्यानंतर चालकावर कारवाई करण्यात आली.
बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. यापैकी तीन जणांना इजा झाली. एका 12 वर्षीय सेंट झेविअर्सच्या मुलाचाही यामध्ये समावेश आहे. त्याच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. डीवाय पाटील रुग्णालयात या सर्वांवर उपचार करण्यात आले. मोटारमनने तातडीने ब्रेक मारला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती.
विशेष म्हणजे नवी मुंबईसारख्या ठिकाणी असलेल्या या क्रॉसिंगवर फाटकही नाही किंवा रेल्वेचा संबंधित व्यक्तीही नाही. रेल्वेच्या निष्काळजीपणाविरोधातही संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही अशा घटना इथे घडलेल्या आहेत. इथे फाटक बसवावं किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.