मुंबई : मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे. महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने मेट्रो प्रवाशांची प्रवासादरम्यान आणि स्थानक परिसरात सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 ने प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांना आता प्रवासी विमाकवच लागू करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व प्रवाशांना वार्षिक सर्वसमावेशक विमा ( annual comprehensive insurance ) पॉलिसी महा मुंबई मेट्रोमार्फत देण्यात येणार आहे.
या विमा योजनेनुसार अनपेक्षित घटनांमुळे दुर्घटनाग्रस्त प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला जास्तीत जास्त रू. 1 लाख तर बाह्यरुग्णांसाठी रू.10 हजारापर्यंतची भरपाई मिळणार आहे. तसेच बाह्यरुग्ण उपचार आणि रुग्णालयात दाखल असल्यास रुग्णालयातील संरक्षणा व्यतिरिक्त OPD ( बाह्यरुग्ण उपचार ) खर्च कमाल रू. 10,000 /- पर्यंत दिला जाणार आहे आणि किरकोळ दुखापतीच्या भरपाईसह वैद्यकीय खर्चाअंतर्गत जास्तीत जास्त रु.90,000 /- इतकी भरपाई देण्यात येणार आहे. तसेच अपघातांदरम्यान प्रवाशांचा मृत्यु झाल्यास 5 लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद असून कायमचं किंवा आंशिक अपंगत्व आल्या 4 लाखांपर्यंत नुकसाईभरपाई या विम्याअंतर्गत मिळू शकेल.
ही पॉलिसी ज्या प्रवाशांकडे वैध तिकीट/पास/स्मार्ट कार्ड/क्यूआर कोड/वैध परवानगी असेल अशा सर्व वैध प्रवाशांसाठी लागू असेल. तसेच सदर पॉलिसी ही वैध प्रवासी हा मुंबई मेट्रो स्थानकाची इमारत, प्लॅटफॉर्म किंवा ट्रेनमध्ये किंवा स्थानक परिसरात जसे की सशुल्क आणि विनाशुल्क परिसर (कॉनकोर्स आणि फलाट )अशा सर्व ठिकाणी वैध असेल. पण मेट्रो स्टेशन इमारतीचे बाह्य क्षेत्र जसे की पार्कींग इत्यादी ठिकाणी काही अपघात घडल्यास या विमा पॉलिसीचे सरक्षण त्या व्यक्तीला लागू होणार नाही.
मेट्रोचा प्रवास सुरक्षित आहेत. परंतू अनपेक्षित उद्भवलेल्या परिस्थितीतही प्रवाशांचे जीवन सुरक्षित करणेही गरजेचे आहे. म्हणून आम्ही सर्व मेट्रो प्रवाशांना सर्वसमावेशक विमा संरक्षण प्रदान करत आहोत. हे विमा कवच लागू केल्यामुळे दुर्दैवी घटनेच्या बाबतीत पुरेसे विमा संरक्षण मिळणार असल्याने प्रवाशांना आता निश्चिंत प्रवास करता येईल असे महा मुंबई मेट्रोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.