Mumbai : आता दुचाकी चालकांना परवान्यासाठी द्यावी लागणार सिम्युलेटर टेस्ट, आरटीओकडून पोर्टेबल बाईक सिम्युलेटर लॉंच
आता दुचाकी वाहनांच्या परवान्यासाठी (License) अर्ज करणाऱ्या वाहनचालकांना सिम्युलेटर चाचणीला (Simulator test) देखील सामोरे जावे लागणार आहे. मुंबई आरटीओकडून (RTO) शुक्रवारी अंधेरी कार्यालयात पोर्टेबल बाईक सिम्युलेटर लॉंच करण्यात आले आहे.
मुंबई : आता दुचाकी वाहनांच्या परवान्यासाठी (License) अर्ज करणाऱ्या वाहनचालकांना सिम्युलेटर चाचणीला (Simulator test) देखील सामोरे जावे लागणार आहे. मुंबई आरटीओकडून (RTO) शुक्रवारी अंधेरी कार्यालयात पोर्टेबल बाईक सिम्युलेटर लॉंच करण्यात आले आहे. जे चालक नवीन परवान्यासाठी अर्ज करणार आहेत त्यांना आता सिम्युलेटर चाचणी देखील द्यावी लागणार आहे. लवकरच राज्यातील 50 आरटीओमध्ये सिम्युलेटर लाँच करण्याची योजना आहे. उमेदवांराचे बाईक चालवण्याचे कौशल्य तसेच तो कठीण परिस्थितीमध्ये कसा बाईक चालवतो याची चाचणी या सिम्युलेटरच्या माध्यमातून होणार आहे. अतिरिक्त परिवहन आयुक्त जे बी पाटील यांच्या हस्ते या नवीन सिम्युलेटरचे लोकार्पण करण्यात आले आहे.सिम्युलेटर चाचणीमध्ये दुचाकी चालवताना वाहनचालकांचा खरा कस लागणार आहे.
अपघाताची संख्या घटणार
याबाबत माहिती देताना आरटीओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जे उमेदवार बाईक चालवण्याच्या परवान्यासाठी आमच्याकडे अर्ज करतात त्यांच्यासाठी आम्ही ग्राउंड टेस्ट घेतो. मात्र आता सिम्युलेटर टेस्ट देखील घेतली जाणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून उमेदवारांचे बाईक चालवण्याचे खरे कौशल्य तपासले जाईल त्यानंतरच त्यांना परवाना जारी करण्यात येणार आहे. यासाठी युनायटेड वे मुंबई या ना नफा ना तोटा तत्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. अशा चाचण्यांमुळे अपघाताची संख्या कमी होण्यास मदत होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.
येत्या काळात 50 ठिकाणी सिम्युलेटर उभारणार
अतिरिक्त परिवहन आयुक्त जे बी पाटील यांच्या हस्ते या नवीन सिम्युलेटरचे लोकार्पण करण्यात आले आहे. येत्या काळात राज्यातील 50 आरटीओमध्ये सिम्युलेटर लाँच करण्याची परिवहन विभागाची योजना आहे.सिम्युलेटर चाचणीमध्ये उमेदवारांचे बाईक चालवण्याचे खरे कौशल्य तपासण्यात येणार आहे. त्यानंतरच परवाना जारी करण्यात येणार असल्याने दुचाकीच्या अपघातांमध्ये घट होण्यास मदत होऊ शकते.