‘महाराष्ट्रातील जातीयवाद थांबवा’, उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांच्या पत्नीची मनोज जरांगे यांना हात जोडून विनंती
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाची दखल राज्य सरकारने घ्यावी म्हणून काल ओबीसी कार्यकर्त्यांनी जालन्यात धुळे-सोलापूर मार्ग अडवला. यानंतर आता दोन्ही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांच्या पत्नीने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे महाराष्ट्रातील जातीयवाद थांबवा, अशी हात जोडून विनंती केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये यासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात ओबीसी सामाजेच नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. गेल्या सहा दिवसांपासूनच्या उपोषणामुळे दोन्ही नेत्यांची प्रकृती आता खालावत चालली आहे. लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे उपोषणस्थळी आज वैद्यकीय पथक दाखल झालं. या पथककडून लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचा ईसिजी काढण्यात आला. दोन्ही नेत्यांना वैद्यकीय पथकाने उपचार घेण्यासाठी विनवणी केली. पण उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. ते उपोषणावर ठाम आहेत. या उपोषणाची दखल राज्य सरकारने घ्यावी म्हणून काल ओबीसी कार्यकर्त्यांनी जालन्यात धुळे-सोलापूर मार्ग अडवला होता. यानंतर आता दोन्ही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांच्या पत्नीने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे महाराष्ट्रातील जातीयवाद थांबवा, अशी हात जोडून विनंती केली आहे.
नवनाथ वाघमारे यांच्या पत्नी नेमकं काय म्हणाल्या?
“नवनाथ वाघमारे यांच्या पोटात अन्न नाही. त्यांचं गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सरकारने योग्य निर्णय घ्यावा. ओबीसींवर अन्याय करू नये. त्यांच्या जीवाला धोका असला तरी हे आंदोलन थांबणं शक्य नाही. ते म्हणतायत तू आपला परिवार संभाळ. माझ्यासाठी आता समाज परिवार आहे. मराठा नेते मजोज जारांगे यांनी दोन जातीमध्यें जो वाद निर्माण केला आहे तो बंद करावा. ही त्यांना विनंती आहे. त्यामुळे महाराष्ट्र्रातील वातावरण खराब होत आहे”, असं नवनाथ वाघमारे यांच्या पत्नी म्हणाल्या. यावेळी नवनाथ वाघमारे यांच्या मुलानेदेखील प्रतिक्रिया दिली. “पप्पाची तब्येत खराब होत आहे. मी त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले कुटुंबाची काळजी घ्या”, असं वाघमारे यांचा मुलगा म्हणाला.
‘राजकीय आरक्षण घालवलं आता शैक्षणिक आरक्षणावर घाला’
नवनाथ वाघमारे यांच्या मुलीनेदेखील प्रतिक्रिया दिली. “माझे वडील समाजासाठी एवढं करत आहेत. त्यामुळे समाजाने त्यांच्यासाठी एकवटलं पाहिजे. ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवलं आहे आणि आता शैक्षणिक आरक्षणावर घाव घातला जात आहे. त्यामुळे समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे आणि आरक्षण वाचवलं पाहिजे. मराठा समाजाला इडब्ल्यूबीएस आणि एसईबीसीचं आरक्षण आहे. तर त्यांना ओबीसीमध्ये येण्याची काय गरज आहे? ओबीसींची मुलं आता कुठे शिक्षण घेऊ लागले आहेत. मात्र मराठा समाजामुळे यात अडथळा निर्माण होत आहे”, असं नवनाथ वाघमारे यांची कन्या म्हणाली.
“मनोज जरांगे पाटील हे माझ्यापेक्षा मोठे आहेत. मात्र ओबीसींमधून आरक्षण घेण्याची त्यांची भूमिका त्यांनी मागे घ्यावी. सरकारने त्यांना आरक्षण दिलं आहे. त्यामुळे त्यांनी शांत बसावं. आम्ही महाराष्ट्रात राहतो. आमचाही विचार सरकारने करावा. माझ्या वडिलांनी आतापर्यंत ओबीसींसाठी खूप आंदोलन केली आहेत आणि आता पहिल्यांदाच ते उपोषण करत आहेत. त्यामुळे त्यांची काळजी वाटते”, असं वाघमारे यांची मुलगी आपल्या वडिलांविषयी म्हणाली.
“समाजात जातीवाद पसरत आहेत. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीवाद करणं हे ठीक नाही. सरकारने जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि माझे वडील ज्या मागणीसाठी उपोषण करत आहेत त्यांची मागणी सरकारने पूर्ण करावी आणि त्यांचं उपोषण सोडवावं, अशी माझी सरकारला विनंती आहे”, असंही वाघमारे यांची मुलगी म्हणाली.