मुंबई : ओला- उबेर सारख्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या वाहतूक धोरणांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मात्र या बदलाचा फटका हा प्रवाशांना बसत असून, प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. नव्या वाहतूक धोरणानुसार आता कॅप चालकांना तुम्हाला कुठे जायचे आहे त्याचे लोकेशन आधीच कळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जवळच कुठे तरी जायचे असेल तर बूक झालेली ट्रीप कॅन्सल करण्याचा अधिकार हा कॅप चालकांना मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ओला-उबेरच्या राइड मोठ्याप्रमाणात रद्द होत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. अखेर याप्रकरणी आता कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आम्ही आमच्या वाहतूक धोरणांमध्ये काही बदल केले असून, नव्या धोरणानुसार आता तुम्हाला कुठे जायचे आहे, ते देखील कॅप चालकाला कळणार आहे. त्यानंतर ही बुकिंग स्वीकारायची की नाही, हे ठरवण्याचा देखील अधिकार त्याला देण्यात आला आहे. या निर्णयामुळे कॅप चालकांचा फायदा होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे, मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये ट्राफीकची समस्या मोठ्या प्रमाणात असते. जर तुम्हाला जवळच कुठेतरी जायचे आहे. तुम्ही त्यासाठी ओला बुक केली, आणि रस्त्यात ट्रॅफीक लागली तर अशा परिस्थितीमध्ये वाहनचालकांचे नुकसान होते. मात्र आता त्याला तुम्हाला कुठे जायचे आहे, हे देखील कळणार असल्याने, तुम्हाला जीथे जायचे आहे ते अंतर आणि रस्त्यावर किती रहदारी आहे हे ठरवून त्याला निर्णय घेता येणार आहे. यामुळे जरी वाहनचालकाचा फायदा होणार असला, तरी याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसणार आहे.