खुल्या गटारात चिमुरडा पडला, मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मुंबईतील गोरेगाव पूर्व भागात मुंबई महानगरपालिकेचा (BMC) निष्काळजीपणा एका दिड वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतला आहे. दिव्यांश हा दिड वर्षांचा मुलगा खेळत असताना खुल्या मॅनहोलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली.
मुंबई: मुंबईतील गोरेगाव पूर्व भागात मुंबई महानगरपालिकेचा (BMC) निष्काळजीपणा एका दिड वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतला आहे. दिव्यांश हा दिड वर्षांचा मुलगा खेळत असताना खुल्या मॅनहोलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली. त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही. फायर ब्रिगेड, बीएमसी कर्मचारी आणि पोलीस या चिमुरड्याचा शोध घेत आहेत.
मुंबईत अनेक ठिकाणी निष्काळजीपणे गटाराची दारे उघडी ठेवली जात आहेत. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. मात्र, तरीही पालिकेला जाग येताना दिसत नाही. दिव्यांश आपल्या घराबाहेर खेळत असतानाच तो मॅनहोलमध्ये पडला. सुरुवातीला कुटुंबीयांना दिव्यांश कोठे आहे याचा काहीच अंदाज आला नाही. तो मॅनहोलमध्ये पडल्याचीही त्यांना कल्पना नव्हती. मात्र, ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली. त्यामुळे हे सर्व समोर आले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याला वाचवण्यासाठी अजूनही शोध मोहिम सुरु आहे. दुसरीकडे मुलाचा शोध न लागल्याने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
स्थानिक लोकांनी बीएमसी प्रशासनावर मॅनहोल अर्ध्यापेक्षा अधिक खुले केल्याचा आरोप केला आहे. परिसरातील नाले आणि अनेक मॅनहोल जागोजागी असेच उघडे करुन ठेवण्यात आली आहेत. याकडे पालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. १२ तास उलटूनही दिव्यांशचा शोध लागलेला नाही. त्यामुळे संपूर्ण परिसरातील लोक संतप्त झाले आहेत.