मुंबईत सरकत्या जिन्यात अडकून दीड वर्षीय मुलाची बोटं तुटली
मुलुंडमध्ये एका मॉलमधील एस्कलेटरमध्ये (सरकते जिने) अडकून दीड वर्षीय मुलाच्या हाताची तीन बोटं (Escalator accident) तुटली आहे.

मुंबई : मुलुंडमध्ये एका मॉलमधील एस्कलेटरमध्ये (सरकते जिने) अडकून दीड वर्षीय मुलाच्या हाताची तीन बोटं (Escalator accident) तुटली आहे. चिन्मय राजिवडे असं या दीड वर्षीय मुलाचे नाव आहे. ही घटना मुलुंडच्या आर मॉलमध्ये घडली. आई-वडिलांची नजर चुकवत चिन्मयने एस्कलेटर चढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी चिन्यम कोसळला आणि त्याची बोटं या सरकत्या जिन्यामध्ये अडकली. सध्या चिन्मयवर केईएम रुग्णालयात उपचार (Escalator accident) करण्यात आले.
दीड वर्षाचा चिन्मय राजिवडे हा चिमुकला आपल्या आई-वडिलांसह मॉलमध्ये खरेदीसाठी आला होता. खरेदी झाल्यानंतर हे तिघे देखील पहिल्या मजल्यावरुन सरकत्या जिन्याच्या सहाय्याने खाली उतरले. परंतु आई-वडिलांच्या नकळत चिन्मय पुन्हा या सरकत्या जिन्याकडे वळला आणि त्याने हा सरकता जिना चढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात चिन्मय खाली कोसळला आणि सरकत्या जिन्याच्या पॅसेजमध्ये त्याची तीन बोटं अडकली गेली आणि चिन्मय जोरात ओरडल्याने त्याच्या आई-वडिलांचे लक्ष त्याच्याकडे गेलं. परंतु आई-वडील त्याच्याकडे पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता.
चिन्मयची तीनही बोटं हातावेगळी झाली होती. यानंतर चिन्मयला त्याच्या पालकांनी फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल केलं. परंतु चिन्मयच्या हातांच्या नसा या दबल्या गेलेल्या असल्यामुळे ही तिन्ही बोटं पुन्हा डॉक्टरांना जोडता आली नाहीत.
या प्रकरणांमध्ये पालकांचा निष्काळजीपणा जितका कारणीभूत आहे तितकाच कारणीभूत आहे मॉल प्रशासनाचा हलगर्जी पणा, असल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात अद्याप मुलुंड पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु या घटनेमुळे हे सरकते जिने किती जीवघेणे ठरू शकतात आणि पालकांनी अशा ठिकाणी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणं किती गरजेचा आहे हे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, सरकत्या जिन्यांना देखील सेन्सर्स असतात तसेच या सेन्सर्समुळे एखादा अडथळा आलाच तर हे सरकते जिने लगेच बंद होतात. यासोबतच अशा सरकत्या जिन्यांजवळ एक अटेंडंट असणं देखील तितकंच गरजेचं असतं यासंदर्भात प्रशासनाकडून नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. परंतु बऱ्याच मॉलमध्ये या सरकत्या जिन्याची देखभाल केली जात नाही. सोबतच सरकत्या जिन्याजवळ अटेंडंट देखील नसतो. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना होतात, असं तज्ज्ञांनी सांगितले.