Anant Ambani | अनंत अंबानीच्या लग्नासाठी पैशांचा धो धो पाऊस, स्टार हॉटेल्सचे एका रात्रीचे दर 1 लाखांनी वाढले
अनंत अंबानी यांचे लग्न मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. यासाठी अनेक व्हीआयपी व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. या व्हीआयपी व्यक्तींना राहण्यासाठी मुकेश अंबानी यांनी बीकेसीमधील काही महागडी हॉटेल्स बुक केली आहेत. पण...
अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै रोजी होत आहे. आपला मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नासाठी मुकेश अंबानी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे आतापर्यंत तीन प्री वेडिंग सोहळे संपन्न झाले आहेत. गुजरातच्या जामनगर येथील प्री वेडिंग सोहळ्यात अनेक बॉलीवूड स्टार आले होते. तेसच देशविदेशातील अनेक नेते, उद्योगपती त्यांच्या या सोहळ्याला हजर होते. अनंत अंबानी यांचे लग्न मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. यासाठी अनेक व्हीआयपी व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. या व्हीआयपी व्यक्तींना राहण्यासाठी मुकेश अंबानी यांनी बीकेसीमधील काही महागडी हॉटेल्स बुक केली आहेत. मात्र, यामुळे BKC आणि आसपासच्या भागातील हॉटेल्सनी आपल्या दरात लक्षणीय वाढ केली आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील दोन मुख्य हॉटेल्सनी एका अलिशान रूमसाठी प्रती रात्र ₹ 13,000 इतका असणारा दर वाढवून तो प्रति रात्र ₹ 91,350 इतका केला आहे. तर, अनंत आणि राधिका यांचे लग्न होणारे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील सर्व रूम्स बुक झाले आहेत. अनंत आणि राधिका यांचा 12 जुलै रोजी विवाहसोहळा आहे. शनिवार 13 जुलै रोजी शुभ आशीर्वादासह हा उत्सव सुरू रहाणार आहे. तर, रविवार 14 जुलै रोज मंगल उत्सव आणि लग्नाचे रिसेप्शन आहे.
ट्रॅव्हल बुकिंग वेबसाइट्सवर 9 जुलै रोजी रूमचे दर ₹ 10,250 प्रति रात्र अधिक कर असे आहेत. तर, 12 ते 15 जुलै रोजी हेच दर ₹ 16,750 अधिक कर असे दाखवीत आहेत. 10 जुलै ते 14 जुलै पर्यंत बीकेसीमधील कोणत्याही हॉटेल्समध्ये रूम्स उपलब्ध नाहीत. अनेक हॉटेलच्या वेबसाइटवर या तारखांना खोल्या विकल्या गेल्याचे दिसून आले. ‘माफ करा, आमच्या वेबसाइटवर विनंती केलेल्या तारखांसाठी ही निवास व्यवस्था यापुढे उपलब्ध नाही’ असा संदेश हॉटेलच्या वेबसाइटवर 10 जुलै ते 11 जुलैपर्यंतच्या बुकिंगसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे.
ट्रॅव्हल वेबसाइट्सने BKC च्या सोफिटेल हॉटेल्सचे रुमचे दर 9 जुलैला ₹13000 अधिक कर, 12 जुलैला ₹30150 आणि 13 जुलैला ₹40590, 14 जुलैला ₹91350, 15 जुलैला ₹16560 प्रति रात्र आणि ₹136680 असे दाखवले आहेत. मात्र, ग्रँड हयात, ताज सांताक्रूझ, ताज वांद्रे, सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेल्समध्ये नमूद केलेल्या तारखांना रूम्स उपलब्ध आहेत.
12 जुलै ते 14 जुलै दरम्यान होणाऱ्या भव्य विवाह सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेच्या कारणास्तव बीकेसी परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी येथील वाहतूक वळविली आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर 12 ते 15 जुलै दरम्यान दुपारी 1 ते मध्यरात्रीपर्यंत प्रवेश प्रतिबंधित असणार आहे.
मुंबईतील बीकेसी हे सर्वात महागड्या व्यावसायिक कॉम्प्लेक्सपैकी एक आहे. येथे अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. बीकेसीमध्ये बीकेसी आणि द कॅपिटल अशी अनेक ग्रेड ए ऑफिस स्पेस आहेत. बँक ऑफ बडोदा, इंडियन ऑइल, गोदरेज सारख्या प्रमुक कंपन्याची कार्यालयेही येथे आहेत. या महत्वाच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक वळवल्यामुळे मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो अशी माहिती बीकेसीमध्ये काम करणाऱ्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने दिली. लग्न सोहळा जरी 12 तारखेला असला तरी वैयक्तिक कार्यालये 8 ते 15 जुलैपर्यंत बंद ठेवू शकतात असेही या कर्मचाऱ्याने सांगितले.