95 टक्क्यांवरील जागांसाठी राज्य मंडळाचे केवळ 20 टक्के विद्यार्थीच पात्र
अकरावीच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 95 टक्क्यांवरील जागांसाठी राज्य मंडळाचे केवळ 20 टक्केच विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशाचा गोंधळ होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
मुंबई : दरवर्षी होणाऱ्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ यंदाही कायम पाहायला मिळत आहे. यंदाच्या अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी 5 जुलै रोजी जाहीर झाली. त्यात राज्य मंडळाच्या (SSC) दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत 20 गुण बंद करण्यात आल्याचा फटका बसला आहे. दरम्यान या सर्वसाधारण यादीत 95 टक्क्यांवरील जागांसाठी राज्य मंडळाचे केवळ 20 टक्केच विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशाचा गोंधळ होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तसेच अकरावीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्गही खडतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यंदाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणाऱ्या 1 हजार 487 विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. त्यातील 1 हजार 186 विद्यार्थी सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसई मंडळाचे आहेत. तर महाराष्ट्रातील केवळ 301 विद्यार्थी यासाठी पात्र ठरले आहेत.
यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत 1 लाख 85 हजार 473 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यात जवळपास 1 लाख 68 हजार 991 म्हणजेच 90 टक्के विद्यार्थी हे महाराष्ट्र बोर्डाचे आहेत. तर 5 हजार 669 सीबीएसई, 7 हजार 881 आयसीएसई, 908 आयजीसीएसई, 7 आयबी, 598 एनआयओएस आणि 1 हजार 119 विद्यार्थी इतर बोर्डाचे आहेत.
तर एकूण सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी वाणिज्य शाखेसाठी सार्वाधिक 1 लाख 17 हजार 275, विज्ञान शाखेसाठी 49 हजार 543, कला शाखेसाठी 17 हजार 301, तर एचएसव्हीसीसाठी 1 हजार 354 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
विज्ञान शाखेकडे कल वाढला
यंदाच्या अकरावी प्रवेशात गुणवंत विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे जास्त असल्याचे दिसून येत आहे. यंदा 95 व त्याहून अधिक टक्के मिळालेल्या सर्वाधिक 804 विद्यार्थ्यांनी सायन्स शाखेसाठी अर्ज केला आहे. त्या खालोखाल कॉमर्स 526 आणि आर्टस् शाखेसाठी 157 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर 90 ते 94.99 आणि 80 ते 89.99 टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 3 हजार 544 तर 12 हजार 879 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेसाठीच अर्ज केले आहेत. तर कॉमर्ससाठी अनुक्रमे 2 हजार 517 आणि 10 हजार 319 विद्यार्थ्यांचे तर आर्टस् शाखेसाठी अनुक्रमे अर्ज केला आहे.
एचएसव्हीसी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ
दरम्यान यंदा विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला असता, 90 टक्क्यांपर्यंत गुण मिळालेल्या एकाही विद्यार्थ्याने एचएसव्हीसी या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी यंदा ऑनलाइन अर्ज केलेला नाही. तर 80 ते 89.99 टक्के गुण मिळालेल्या केवळ 17 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे यातील 16 विद्यार्थी हे महाराष्ट्र बोर्डाचे असून एक विद्यार्थी सीबीएसई बोर्डाचा आहे.