ओसरगाव, राजापूर टोलनाका आजपासून सुरू; मुंबई गोवा महामार्गावरील प्रवासासाठी मोजावे लागणार पैसे
मुंबई- गोवा महामार्गावर असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ओसरगाव टोलनाका आजपासून पुन्हा एकदा सुरू झाला आहे. या टोल नाक्याचा सर्वाधिक फटका हा गोव्यावरून सिंधुदुर्गला नियमित प्रवास करणाऱ्यांना बसणार आहे.
सिंधुदुर्ग : मुंबई- गोवा महामार्गावर असलेला सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यामधील ओसरगाव टोलनाका (Osargaon Toll) आजपासून पुन्हा एकदा सुरू झाला आहे. त्यामुळे आता मुंबई – गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना या टोलवर देखील पैसे मोजावे लागणार आहेत. या टोलला अनेक राजकीय पक्षांकडून विरोध झाला होता. टोल सुरू करू नये अशी मागणी देखील करण्यात आली होती, तसेच आंदोलनचाा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र राजकीय विरोधानंतर देखील हा टोलनाका सुरू करण्यात आला आहे. एमटी करीमुनिसा या कंपनीला टोल वसुलीचे कंत्राट मिळाले आहे. ओसरगावसोबत राजापूर-हातीवलेमधील (Rajapur Toll) टोलनाकाही आजपासून सुरू झाला आहे. टोलनाक्यासाठी आता पैसे द्यावे लागणार असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘असा’ असेल टोलचा दर
जीप, व्हॅन आणि कारसाठी एकेरी प्रवासाकरता 90 रुपये भरावे लागणार आहेत. तर दुहेरी प्रवासाचा एकाचवेळी टोल भरल्यास 135 रुपयांचा टोला द्यावा लागणार आहे. मालवाहू वाहने, हालकी व्यवसायिक वाहने तसेच मीनबससाठी एकेरी प्रवासाकरता 135 रुपये आणि रिटर्न प्रवसाचा टोल भरल्यास 220 रुपये इतका टोल लागणार आहे. ट्रक, बस यासारख्या आवजड वाहनांसाठी डबल अँक्सल असल्यास 305 रुपये तर डबल प्रवासाठी 500 रुपये इतका टोल लागणार आहे. ट्रक किंवा बस ही ट्रिपल अँक्सल असेल तर त्यांच्यासाठी 335 रुपये एवढा टोल भरावा लागणार आहे. तर रिटर्न प्रवासासाठी 500 रुपये टोल भरावा लागणार आहे. वाहनाचे पासिंग जर एमएच 07असेल तर हलक्या वाहनांसाठी 45 रुपये टोल भरावा लागणार आहे. मिनिबससाठी 75 रुपये तर ट्रक आणि बससाठी 115 रुपये एवढा टोल लागणार आहे.
315 रुपयांमध्ये मासिक पास
दरम्यान टोलपासून जी वाहने 20 किलोमीटरच्या अंतरात येतात. त्यांच्यासाठी पासची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी अशा वाहनधारकांकडून दर महिन्याला 315 रुपये आकारण्यात येणार आहेत. या पासच्या मोबदल्यात ते महिनाभर टोलवरून ये-जा करू शकणार आहेत. बाईक आणि रिक्षाला मात्र या टोलमधून सूट देण्यात आल्याने अशा वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे गोव्याहून सिंधुदुर्गात नियमित ये जा करणाऱ्या या प्रवाशांना मोठी आर्थिक झळ बसू शकते. हा टोल नाका सुरू करण्यास राजकीय पक्षांसोबतच स्थानिकांचा देखील विरोध होता. मात्र विरोधानंतर देखील हा टोल नाका सुरू करण्यात आला आहे.