Oxygen Express : देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ला अनिल परबांनी दाखवला हिरवा झेंडा
ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतोय. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतोय. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार आज पहिल्या ऑक्सिजन एक्सप्रेसला परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. (Anil Parab showed the green flag to Oxygen Express)
राज्याला विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी 7 मोठे टँकर घेऊन जाणारी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन आज पहिली रेल्वे रवाना केली. अनिल परब यांनी या एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवून रवाना केले.
5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन उपलब्ध होणार
या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असं केंद्र शासनाला सुचवलं होतं. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली. यापुढील काळात ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.
राज्यात उद्भवलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणम येथून द्रवरुप ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून ग्रीन कॉरिडॉर गाड्या रवाना. या रेल्वे गाडीस परिवहनमंत्री @advanilparab यांनी दाखविला हिरवा दिवा. pic.twitter.com/X3QVlKkL2a
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 19, 2021
8 दिवसांपासून केंद्राकडे पाठपुरावा
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्याचा परिवहन विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग गेल्या आठ दिवसांपासून केंद्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे यासंदर्भात पाठपुरावा करत होते. ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकरचे आकारमान, उंची याअनुषंगाने विद्युतीकरण झालेल्या रेल्वेमार्गावरुन वाहतूक करण्याबाबत काही अडचणी, आव्हाने होती. तथापि, योग्य आकारमानाच्या टँकर्सचा शोध घेऊन बोईसरच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन रेल्वेच्या सपाट वॅगनवर रिकामे टँकर लोड करुन यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली.
‘ऑक्सिजन एक्सप्रेस’चा मार्ग कसा असणार?
कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे अधिक व्यवहार्य असल्याने 2 दिवसात येथिल प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आज प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून सायंकाळी 7 वाजता ऑक्सिजन एक्स्प्रेस रवानाही करण्यात आली. हे प्रत्येकी 16 मे. टन. द्रवरुप ऑक्सिजन वाहतुकीची क्षमता असलेले विशेष टँकर आहेत. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, ताईयो निप्पॉन सॅन्सो इं., एअर लिक्विड, लिंडे आदी कंपन्यांचे हे टँकर आहेत. नेहमीच्या पुणे-सिकंदराबाद- विजयवाडा रेल्वेमार्गा वर पुणे दरम्यान बोगदे असल्यामुळे ओव्हरहेड वायरची उंची तुलनेत कमी होत असल्याने या मार्गावरुन ऑक्सिजनचे टँकर वाहून नेणे शक्य नव्हते. त्यामुळे तुलनेत लांबचा असला तरी व्यवहार्य असा सूरत- नंदूरबार- जळगाव- नागपूर असा लोहमार्ग निवडण्यात आला आहे.
महाराष्ट्रासाठी विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी ७ टँकरची देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ रवाना. परिवहन मंत्री @advanilparab यांनी दाखविला हिरवा दिवा. रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग. पाच दिवसात येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू. pic.twitter.com/JQpqYUjrp5
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 19, 2021
अडथळा येऊ नये म्हणून ‘ग्रीन कॉरिडॉर’
दरम्यान “या एक्स्प्रेसला सिग्नल्सचा कमीत कमी अडथळा येईल अशा पद्धतीने ‘ग्रीन कॉरिडॉर’ही तयार करण्यात आला असून केवळ दीड दिवसात ती विशाखापट्टणम येथे पोहोचेल. तेथील ‘राष्ट्रीय इस्पात लि.’ या कंपनीतून दीड-दोन दिवसात द्रवरुप प्राणवायु भरुन टँकर लगेच पुन: महाराष्ट्राकडे रवाना होतील. अशा पद्धतीने येत्या पाच दिवसाच्या आत सुमारे ११० मे. टन ऑक्सिजन राज्याला रेल्वेवाहतुकीद्वारे राज्याला प्राप्त होईल. उच्च वजनक्षमतेमुळे ऑक्सिजन टँकरची वाहतूक रस्तामार्गे करणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नव्हते तसेच त्यासाठी प्रदीर्घ वेळ लागला असता.” अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.
संबंधित बातम्या :
India Corona Update : सर्वसामान्य नागरिकांसाठी 48 तासांत केंद्र सरकारचे 5 मोठे निर्णय, वाचा सविस्तर
मोठी बातमी, 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार
Anil Parab showed the green flag to Oxygen Express