ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे यांची भेट
ज्येष्ठ पत्रकार, कृषीतज्ज्ञ पी. साईनाथ यांनी आज 'मातोश्री'वर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शेतकरी प्रश्नावर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत कृषीतज्ञ किशोर तिवारीही उपस्थित होते.
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, कृषीतज्ज्ञ पी. साईनाथ यांनी आज ‘मातोश्री’वर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शेतकरी प्रश्नावर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत कृषीतज्ञ किशोर तिवारीही उपस्थित होते. कृषी संकट आणि पाणी संकटाबाबत संसद आणि राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी पी साईनाथ यांनी केली. याशिवाय केंद्रात आणि राज्यात कायमस्वरूपी कृषी आयोग स्थापन करणात यावा, असंही ते म्हणाले.
दरम्यान, पी साईनाथ आणि उद्धव ठाकरे यांच्यात शेतकरी पीक विमा योजना, दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांचे पुनर्वसन, कर्जमाफी या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
शेतकरी कर्जमाफी आणि पीक विम्याचा मुद्दा शिवसेनेने लावून धरला आहे. शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी, तसंच पीकविम्याबाबत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करु नये अशी भूमिका शिवसेनेची आहे.
कोण आहेत पी साईनाथ?
पी. साईनाथ हे भारतातील कृषी आणि ग्रामीण पत्रकारितेचा मोठा चेहरा आहेत.
तामिळनाडूत जन्मलेले 52 वर्षीय पी साईनाथ यांनी शेती आणि शेतकरी समस्यांबाबत सखोल लेखन केलं आहे
सामाजिक आणि आर्थिक समानता, ग्रामीण भारत, भारतातील गरिबी आणि जागतीकीकरण, दुष्काळ आणि शेतीच्या समस्या, अशा विषयांवर त्यांचा अभ्यास आहे
द हिंदू या दैनिकात त्यांनी ग्रामीण घडामोडींचे संपादक म्हणून काम पाहिलं आहे.
पत्रकारितेतील कार्याबद्दल पी साईनाथ यांना मानाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.