जय-पराजय अन् बरंच काही…; विधानपरिषदेच्या विजयानंतर पंकजा मुंडे लाईव्ह
Pankaja Munde on Vidhanparishad Election 2024 : विधानपरिषदेच्या निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीतील विजयावर त्यांनी भाष्य केलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही त्यांनी आभार मानले.
काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा विजय झाला. या विजयानंतर त्यांचे समर्थक पंकजा मुंडे यांचं अभिनंदन करत आहेत. अशातच पंकजा मुंडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. तेव्हा त्या विविध मुद्द्यांवर बोलत्या झाल्या. कालची विधान परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर माझी प्रतिक्रिया ही आहे की मी सगळ्यांचे आभार मानते. संघटनेचे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे हे सर्व माझ्या मागे आहेत. म्हणून हे सर्व शक्य झालं. संपूर्ण यश हे या सर्वांचं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
जय-पराजयावर काय म्हणाल्या?
राजकारणात आणि निवडणुकांमध्ये जय-पराजय हा चालतच असतो. देशातील 10 बड्या नेत्यांची नावं काढली तरी तेही कधी ना कधी संघर्षाला समोरे गेले आहेत. त्यामुळे 2019 ला विधानसभेला माझा पराभव झाला. पण 2024 ची लोकसभेची निवडणूकच वेगळी होती. त्याला मी पराभव मानतच नाही. अटीतटीच्या लढाईत सहा लाख 75 हजार मतं मी घेऊ शकले. देशातील सर्वोच्च मतं घेणाऱ्यांची यादी केली. तर तशी मतं आपल्याला मिळाली आहेत. या निवडणुकीत लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. थोडक्यात घासून तो पराभव झाला. त्याला मी पराभव मानत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
येणाऱ्या निवडणुका आम्हाला चॅलेंज असणार आहेत. पण कालच्या निवडणुकीमुळे पुढील निवडणुका त्यांच्या चार्जिंग सोपं होत चालला आहे… आगामी निवडणुकांमध्ये आमचा विजय रिअल समोर दिसतोय, असंही पंकजा म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेवर पंकजा मुंडे म्हणाल्या…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. लाडकी बहीण योजना चांगली आहे. माझ्याकडे बालविकास खातं होतं. तेव्हा देखील लहान मुलींसाठी योजना केली होती. त्या योजनेवर ती मोठ्या प्रमाणात काम केलं होतं. मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अभिनंदन करायचा आहे की याचा फायदा महिलांना जास्त होईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. यावरही पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीय. आरक्षणाचा वाद हा बीड जिल्ह्याच्या मर्यादित नाही… हा मुळात वाद नाही… एका समाजाच म्हणणं आहे आमच्यावर अन्याय झाला… सरकार आणि आम्ही जास्त प्रयत्न करतोय कि आरक्षणाचा मुद्दा कसा सुटेल, असं त्या म्हणाल्या.