Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना ‘ठाकरे’ सुटेना! एकनाथ शिंदे यांच्या घराच्या भिंतीवर उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज माझ्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड केले आणि भाजपासोबत हातमिळवणी करून सत्तेत सहभागी झाले. आता यंदाच्या आषाढी एकादशीची महापूजादेखील सपत्नीक ते करणार आहेत. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. यानिमित्ताने ते अजूनही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यापासून दूर गेले नसल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या घरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो पाहायला मिळाले. आपण शिवसेनेतच (Shivsena) आहोत, असे वारंवार सांगणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या मनात अजूनही पक्षप्रमुखांविषयी आदराचीच भावना असल्याचे दिसून येत आहे.
वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार
रविवारी आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने होणाऱ्या महापूजेचे निमंत्रण पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.
‘हे माझे भाग्य’
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज माझ्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन माझा सन्मान केला, असे ट्विट यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. तर यंदाची आषाढी वारीत विठ्ठलाची महापूजा करणार, असे सकाळीच एकनाथ शिंदे म्हणाले होते. पंढरपुरात विठलाची पूजा करण्याचे भाग्य मला आणि कुटुंबाला मिळाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज माझ्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन माझा सन्मान केला. pic.twitter.com/kpioTU9khK
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022