देशातील दोन बडे नेते आज महाराष्ट्र दौऱ्यावर; पंतप्रधान मोदी मुंबईत, तर राहुल गांधी कोल्हापुरात
Narendra Modi and Rahul Gandhi in Maharashra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्या आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीआधी देशातील दोन बड्या नेत्यांचा आजचा हा महाराष्ट्र दौरा महत्वाचा असणार आहे. वाचा सविस्तर...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. देशातील दोन बडे नेते आज महाराष्ट्रात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुंबई मेट्रो- 3 चं मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात येण्याला वेगळं महत्व आहे.
राहुल गांधी कोल्हापुरात
काँग्रेस नेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरच्या कसबा- बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. पुतळा परिसरात कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. पुतळा परिसरात भव्य स्टेज उभारण्यात आलं आहे. पुतळा अनावरणानंतर राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. संविधान सन्मान कार्यक्रमाला राहुल गांधी हजेरी लावणार आहेत. कालच राहुल गांधी कोल्हापुरात येणार होते. पण विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा कालचा दौरा रद्द झाला. मात्र आज ते कोल्हापुरात येणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत असणार आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईत मेट्रो -3 चं आज लोकार्पण केलं जाणार आहे. तसंच इतर काही विकासकामांचं लोकार्पण केलं जाणार आहे. तसंच वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरही मोदी जाणार आहेत.
नरेंद्र मोदींचा वाशिम दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिम जिल्ह्याच्या दौ-यावर येणार आहेत. पोहरादेवीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. यामुळे देशातील सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यासोबतच सुमारे 56 हजार 100 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते 23,300 कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. ज्यामध्ये देशी गायीच्या संगोपणासाठी ‘युनिफाइड जीनोमिक चिप’ लॉन्च केली जाणार आहे. या तंत्रज्ञानाने गाईच्या गर्भधारणेसाठी लिंग वर्गीकरण करणं, शक्य होणार आहे. ज्यामुळे देशी गाईंच्या उच्च प्रतिच्या फक्त कालवडी जन्माला येतील. तसंच बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या ‘बंजारा विरासत संग्रहालयाचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.