आधी पोलीस अधिकाऱ्याला आता थेट मुंबई महापौरांना धमकी, गुजरातमधील महाभागाला पोलीस कोठडी
राज्याची राजधानी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई : राज्याची राजधानी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता ही धमकी देणाऱ्या आरोपी मनोज देधिया याला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्याला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे ही धमकी देणाऱ्या आरोपीने अशाच प्रकारे अनेकांना धमक्या दिल्याचंही पोलीस तपासात उघड झालंय (Police custody to accused of threatening to Mumbai Mayor Kishori Pednekar).
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना 22 डिसेंबर रोजी मोबाईलवर एक फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना धमकावलं. तुम्हाला ठार करू असं तो बोलला. धमकीचा फोन आला तेव्हा पेडणेकर या महापालिका कार्यालयात होत्या. त्यामुळे त्यांनी तात्काळ जवळच्या आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे जाऊन सुरुवातीला तक्रार (एनसी) नोंदवली. मात्र, तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी एनसीचं रूपांतर गुन्ह्यात केलं.
गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पेडणेकर यांना ज्या मोबाईल नंबरवरुन फोन आला त्या नंबरबाबत तांत्रिक तपास करण्यात आला. यावरुन पोलिसांनी धमक्या देणाऱ्याला शोधून काढलं. आरोपी गुजरात राज्यातील जामनगर येथील आहे. त्याचं नाव मनोज देढिया असं असल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आज (7 जानेवारी) सकाळी मुंबईत आणलं. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं.
मनोज देधिया हा जामनगर येथे राहतो. त्याच्या वडिलांचं किराणा मालाचं दुकान आहे. मनोज दहावी पास आहे. वडिलांनी त्याला मोबाईल घेऊन दिल्यानंतर तो सतत सोशल मीडियावर असतो. सोशल मीडिया हाताळताना त्याने मुंबईच्या महापौर याचा नंबर पाहिला आणि त्याने त्या नंबरवर फोन करून धमकी दिली. यापूर्वी त्याने अशाच पद्धतीने कर्नाटक राज्यातील एका पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती. मात्र, त्यावेळी त्या अधिकाऱ्याने मनोज यास खडसावलं होतं.
संबंधित बातम्या :
धक्कादायक! मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी
धमकीच्या फोननंतर किशोरी पेडणेकरांचा नांगरे-पाटलांना कॉल, परिचित व्यक्ती रडारवर
धमकीनंतर किशोरी पेडणेकरांचा थेट विश्वास नांगरे-पाटलांना फोन; 24 तासांच्या आत ‘तो’ आरोपी ताब्यात
Police custody to accused of threatening to Mumbai Mayor Kishori Pednekar