आरेतील वृक्षतोडीला विरोध, प्रकाश आंबेडकर पोलिसांच्या ताब्यात, बारामतीत दगडफेक
दिवसेंदिवस पर्यावरणीय प्रश्न गंभीर होत असताना नागरिकांमधील पर्यावरणीय संवेदनशीलताही वाढत असल्याचं दिसत आहे.
मुंबई: दिवसेंदिवस पर्यावरणीय प्रश्न गंभीर होत असताना नागरिकांमधील पर्यावरणीय संवेदनशीलताही वाढत असल्याचं दिसत आहे. मुंबईचं फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या आरेतील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरही नागरिकांनी आपला प्रखर विरोध तीव्र केला आहे. आता वंचित बहुजन आघाडीने (VBA on Aarey Tree cutting) देखील यात उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः आरेमध्ये येऊन याला विरोध (Prakash Ambedkar Oppose Aarey Tree Cutting) केला. त्यानंतर पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटायला लागले आहेत. बारामतीतील गुनवडी चौकात याचा निषेध म्हणून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. बसवर ‘बाळासाहेबांना अटक करणाऱ्या BJP सरकारचा निषेध’ असं फलक लावून दगडफेक झाली. दगडफेक करणारे 4 अज्ञात तरुण फरार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने घाईघाईत रात्रीच्या वेळीच झाडांची कत्तल सुरु केली. त्यामुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला जोरदार विरोध केला. यावेळी पोलिसांनी बळाचाही उपयोग केला. त्याविरोधातच प्रकाश आंबेडकर रविवारी (6 ऑक्टोबर) आरेत पोहचले. वंचित बहुजन आघाडीने (VBA) नेहमीच आरेतील झाडांच्या तोडीला विरोध केला आहे. आम्ही या वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी आणि सरकारला प्रश्न करण्यासाठी येथे आलो आहोत, असंही यावेळी आंबेडकरांनी सांगितलं.
‘कायदा सुव्यवस्था राखा’
प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये म्हणून स्वतः प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पोलिसांनी आपल्याला अटक केलेली नसून केवळ ताब्यात घेतल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
The @VBAforIndia has been against the Aarey tree-cutting from the start. I went there to protest & ask the govt some valid questions. I have been detained & not arrested. I am currently at Powai police station. Don’t believe rumours & I appeal to everyone to maintain law & order. pic.twitter.com/dX9NEymkgi
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 6, 2019
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मला अटक करण्यात आलेलं नसून ताब्यात घेतलं आहे. मला पोलिसांनी पवई पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी.”
दरम्यान, आरेतील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना देखील पोलिसांनी अशाच प्रकारे ताब्यात घेतले होते. या मुद्द्यावर राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष आणि आता वंचित बहुजन आघाडीने यात उडी घेतल्याने हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.