सरकारचे आरोग्य मदतीचे दावे पोकळ? नेमकं वास्तव काय? वाचा सविस्तर
मुंबईत 2 लाख 80 हजाराच्यावर नागरिकांना कोरोना, पण फक्त 1 हजार 993 लोकांना सरकारी जनआरोग्य योजनेनं आधार
मुंबई : कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Uddhav Thackeray) ज्या योजनेचं तोंडभरुन कौतुक केलं, पंतप्रधानांनीही (Prime Minister Narendra Modi) जनतेच्या आरोग्यासाठी केंद्राची जी योजना आणली, आणि ज्या योजना जनतेसाठी जीवनदायी ठरतील, असा दावा राज्य आणि केंद्र सरकारनं केला. ती महात्मा फुले जनआरोग्य योजना (Mahatma Phule Health Insurance Scheme ) आणि पंतप्रधान जन आरोग्य विमा (Prime Minister Health Insurance Scheme) योजनेचा खरा लाभ किती लोकांना मिळाला हे समजल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. जी मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली. ज्या मुंबईत 2 लाख 80 हजाराच्यावर नागरिकांना कोरोनानं आपल्या दुष्टचक्रात ओढलं. त्या मुंबईकरांपैकी फक्त 1 हजार 993 लोकांना जनआरोग्य योजनेनं आधार दिला..माहिती अधिकारात (Right to Information) ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
(Poor condition of government health insurance schemes)
मुंबईत ही स्थिती मग महाराष्ट्रात काय?
महाराष्ट्राचा विचार केला तर हे चित्र अधिक स्पष्ट होईल. 1 डिसेंबर 2020 पर्यंत 18,28,826 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या फक्त 30 टक्के म्हणजेच 44 हजार 431 लोकांना सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यातील फक्त 8 टक्के लोकांनाच विमा मंजूर करण्यात आला. बाकी रुग्णांना एकतर विमा नाकारण्यात आला, किंवा प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आली. कोरोना काळात 110.72 कोटी रुपये विम्यासाठी मंजूर झाले. मात्र, त्यातील फक्त 32.83 कोटींची रक्कम रुग्णांच्या विम्यापोटी रुग्णालयांना देण्यात आली.
विमा लाभार्थ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी
सरकारच्या विमा योजनेचे सर्वाधिक लाभार्थी पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यात 7 हजार 633 लोकांनी विम्याला लाभ घेतला. तर त्यानंतर ठाण्याचा नंबर लागतो, इथं 4 हजार 166 रुग्णांना सरकारी विमा मंजूर झाला. साताऱ्यातील विमा घेणाऱ्यांची संख्या 2 हजार 948 तर सांगलीत 2 हजार 557 आहे, तर मुंबईत फक्त 1 हजार 993 लोकांना विम्याचा लाभ मिळाला. अहमदनगरमध्ये 2 हजार 157 तर नाशिकमध्ये 1 हजार 891 लोकांना विम्याला लाभ मिळाला.
केशरी रेशनकार्ड धारकांनी घेतला विम्याचा सर्वाधिक लाभ
सरकारच्या आरोग्य विमा योजनांला सर्वाधिक लाभ केशरी रेशनकार्ड असणाऱ्या रुग्णांनी घेतला आहे. एकूण लाभार्थ्यांपैकी 32 हजार 662 केशरीकार्ड धारकांना याचा लाभ झाला आहे. तर दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या पिवळ्या रेशनकार्ड धारकांना या योजनेचा अत्यल्प प्रमाणात नेचा लाभ झाला. फक्त 6 हजार 362 पिवळ्या रेशनकार्ड धारकांना याचा लाभ झाला. तर ज्यांच्याकडे पांढरं रेशनकार्ड आहे, त्यांच्यापैकी केवळ 4 हजार 952 लोकांना आरोग्य विमा योजनेचा लाभ झाला.
सरकारी विमा अंमलबजावणीत अडचण कुठे?
केंद्र सरकारची पंतप्रधान जनआरोग्य विमा योजना असो वा राज्य सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजना, दोन्ही योजनांची परिस्थिती अशीच आहे. अनेक रुग्णालयांमध्ये या योजनेला लाभ मिळत नाही, तर अनेक रुग्णालयात ही योजना असली तरी त्याला लाभ रुग्णाना देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. सरकारकडून विमा मंजूरीचं प्रमाण अत्यल्प आहे..त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकार ज्या योजनांच्या गवगवा करतं, जमिनीवर त्यांची स्थिती ही भयानक आहे. त्यामुळंच अनेक रुग्णालय ही योजना देण्यात टाळाटाळ करत असल्याचं बोललं जातं.
संबंधित बातम्या:
WhatsApp वरुन आरोग्य विमा खरेदीही शक्य, काय आहे योजना?
अपघात विमा योजनेत 1 एप्रिलपासून मोठे बदल, 2.5 लाख ते 1 कोटीपर्यंत मिळणार लाभ
(Poor condition of government health insurance schemes)