मुंबईः आमदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आणि त्यांच्यासोबत 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं होते. त्या गोष्टीवर आता बोलताना आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचीही काही तरी वाईट बाजू असेलच आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनही चुका झाल्या असणार आहेत.
त्यामुळे आता त्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. त्याच बरोबर इतरांवर टीका करताना आणि दुसऱ्याला दोष देण्यात आपला पक्ष छोटा होईल असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ज्या ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यांच्यावर 50 खोके घेतल्याची टीका होते त्याच प्रमाणे त्याची चर्चाही होत असतेच.
त्याच बरोबर पंक्चर टायर, आणि पंक्चर आमदार अशी टीका केली जात असली तरी आगामी निवडणुकीत कोण पंक्चर आमदार आहेत ते समजेलच असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. मंत्रीपदासाठी लाईनमध्ये जा आणि उभा राहा या मानसिकतेचा बच्चू कडू नाही, ती लाईनच मी तोडून टाकू असा टोला त्यांनी त्यांच्याव टीका करणाऱ्यांना लगावला आहे.
मंत्री मंडळाच्या विस्ताराबद्दल आपल्याला काही माहिती नाही आणि आपण काय भविष्यकार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितले. त्याबद्दल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्याची चर्चा करावी लागेल असंही त्यांनी यावेळी सांगितले.
गुवाहाटी दौऱ्याबद्दल बोलतानाही त्यांनी सांगितले की, मी जरी गुवाहाटीला गेलो नसतो तरी मविआचे सरकार कोसळलेच असते. कारण हे राजकीय बहुमताचं गणित होते.
त्यामुळे एकट्या बच्चू कडूमुळे हे सरकार कोसळले नाही तर सगळ्यांच्या मनात असंतोष होता म्हणून हे मविआचे सरकार कोसळल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीविषयी आणि सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीविषयीही मत व्यक्त केले.
सत्यजित तांबे यांचा उठाव हा योग्य की अयोग्य हे मतदारांकडूनच कळणार आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अजित पवार यांनी प्रचार करावा की करू नये हा प्रश्न नाही. आणि सत्यजित तांबे यांनी कुठे जावे त्याचा विचार त्यांनी करावा असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.