महाराष्ट्रात खेला होबे…? प्रकाश आंबेडकर तिसरी आघाडी स्थापन करणार?; प्रकाश शेंडगे काय म्हणाले?
राज्यात तिसरी आघाडी होईल. आम्ही राजकीय भूकंप घडवून आणणार आहोत. नव्या आघाडीमुळे राज्यात एक नवा पर्याय मिळेल. आम्ही आमच्या जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे. त्यावर चर्चा होणार आहे. दोन दिवसात आम्ही अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जवळपास महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यात जमा आहे. महाविकास आघाडीने दिलेल्या जागांवर प्रकाश आंबेडकर खूश नाहीत. त्यामुळे त्यांनी आता नवीन पर्यायांचीही चाचपणी सुरू केली आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा झाली. या भेटीनंतर राज्यात तिसरी आघाडी होणार असल्याची घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रकाश शेंडगे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबेडकर यांची आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यानंतर प्रकाश शेंडगे यांनी मीडियाशी संवाद साधला. निवडणुकीत तिसरी आघाडी होईल आणि राजकीय भूकंप राज्यात होईल अस भाकीत शेंडगे यांनी केलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत राहणार नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
तिसरी आघाडी होईल
यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत तीन बैठका झाल्याचे शेंडगे यांनी सांगितलं. राज्यात तिसरी आघाडी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी राज्यात ताकतीने लढेल. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना आमच्या जागांचे प्रस्ताव दिला आहे. कोण कुठे लढेल याची चर्चा प्रकाश आंबेडकर यांच्याशी केली आणि त्यांना प्रस्ताव दिला. आरक्षणवाद्यांनी एकत्रित लढलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
22 जागांवर लढायचंय
प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्हाला इंडिआ आघाडीचा विषय माहीत आहे. त्यांची इंडिआ आघाडीशी चर्चा सुरू आहे. ते इंडिया आघाडीसोबत जातील की नाही माहीत नाही. तसं वाटत नाही. त्यामुळेच आम्ही आंबेडकर यांच्याकडे 22 जागा लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर काम सुरू आहे. राज्यात 60 टक्के ओबीसी आणि 20 टक्के भटक्या समाजाची व्होट बँक आहे. सर्वजण एकत्र आले तर राज्यात मोठा भूकंप होईल, असं सांगतानाच आम्ही इंडिया आघाडीत जाण्याचा प्रश्नच नाही, असं शेंडगे यांनी स्पष्ट केलं.
घोडा मैदान जवळ आहे
ज्या आमदार आणि खासदारांनी ओबीसींविरोधात भूमिका घेतली त्यांना ओबीसी समाज जागा दाखवून देईल. घोडा मैदान जवळ आहे. काही लोक 400 पार म्हणत आहेत. काही लोक 300 पार म्हणत आहेत. पाहू काय होतं ते, असंही त्यांनी सांगितलं.