गिरीश गायकवाड, मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती ताजी असताना आज मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ठाकरे गटासोबत जाईल, असंही स्पष्ट केलं होतं. या सगळ्या घडामोडींनंतर आज मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.
विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर आज फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेत असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर आज मंत्रालयात गेले. तिथे त्यांनी राज्याच्या दोन्ही प्रमुखांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मध्यप्रदेश ऐवजी दिल्लीहून बनवून आणण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी संबंधित बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.