‘वंचित’ तिसऱ्या आघाडीत सामील होणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं
Prakash Ambedkar on Third front : वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा होत आहे. त्यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी यांच्याशी बातचित झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? वाचा सविस्तर...
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच राज्यात तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरु आहे. दोन दिवसांआधी पुण्यात संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू यांची बैठक पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनाही तिसऱ्या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं राजू शेट्टी म्हणाले होते. त्यावर आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राजू शेट्टीसोबत जी चर्चा झाली. ती तुमच्यासमोर मांडतो. वामनराव चटप राजुरामधून लढतात आणि गोंडवाना पार्टी देखील तिथून लढते. वामनराव चटप दुसऱ्या जागेवरुन लढणार असतील तर आम्ही विचार करु शकतो. आपण रिजनल पार्टीसंदर्भात बोललो तर ठिक आहे. लिस्ट आमच्याकडे आलेली आहे. बच्चू कडूंबरोबर आमचं जमू शकत नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
प्रकाश शेंडगे यांच्याकडून आम्हाला अजून तसा कोणाचा प्रस्ताव आलेला नाही. वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी संघटना जिल्हाजिल्ह्यातील कमिटी उमेदवार ठरवणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे. त्यासंदर्भात मविआनं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. ओबीसीला उमेदवारी मिळालेली नाही, असं ओबीसींना वाटत आहे. निजामशाही मराठ्यांना त्यांनी उमेदवारी दिली. आरक्षणवादी उमेदवारांना आम्ही प्रतिनिधीत्व देतोय, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?
राष्ट्रपती राजवट राज्यात लावली जाईल अशी चर्चा होती. 26 किंवा 29 नोव्हेंबर अशा दोन तारखा आहेत. आताचं सभागृह या दोन तारखांच्या प्रमाणे सभागृह डिझॉल्व्ह होतं. आमदारकीचा निश्चित कार्यकाळ आहे. त्यात सभागृह सुरु आहे दाखवायचं आहे तर एखाद्याला शपथविधी दाखवावा लागेल. माझ्या अंदाजाने जे वारे वाहत होते. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी ही शक्यता नाही. 12 ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीचं नोटिफिकेशन निघेल, असं गृहित धरुन चाललो आहे. 15 नोव्हेंबरला मतदान कुठल्याही परिस्थितीत मतदान घ्यावं लागेल आणि निकाल जाहीर करत शपथविधी कार्यक्रम घ्यावं लागेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
धारावीतील तणावपूर्ण परिस्थितीवर आंबेडकर म्हणाले….
धारावीत मस्जिदचा अनधिकृत भाग मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आला. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. धार्मिक राजकारण उभं करण्याची परिस्थिती दिसत आहे. मशिदीला टार्गेट करण्याचा देखील प्रयत्न होतोय मशिद पाडायची की नाही, याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला दिल्यानंतरही नोटीसा येता आहेत. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोय, असं आंबेडकर म्हणाले.