Prakash Ambedkar : शिंदे गटासोबत युती करणार का?; प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा
आमची युतीची कोणतीही चर्चा झाली नाही. भाजपसोबत ज्या पक्षासोबत आहे. त्यांच्याशी आमची कधीच युती होणार नाही. त्यामुळे आमची युती एकनाथ शिंदे गटाशी होणार नाही.
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आंबेडकर आणि शिंदे यांच्यात युतीची चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आमची युतीची कोणतीही चर्चा झाली नाही. भाजपसोबत ज्या पक्षासोबत आहे. त्यांच्याशी आमची कधीच युती होणार नाही. त्यामुळे आमची युती एकनाथ शिंदे गटाशी होणार नाही. आमची युती ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत होणार आहे. उद्धव ठाकरे आणि माझ्यात त्याबाबत कमिटमेंट झाली आहे. फक्त जाहीर होणं बाकी आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल भेट झाली. यावेळी बऱ्याच गोष्टी चर्चेत आल्या. पण पक्षाची आमची जी भूमिका आहे ती ठाम आहे. आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. शिवसेनेसोबतच निवडणुका लढवायच्या आहेत. त्यात बदल होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याबाबत सांगितलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भाजप ज्या पक्षासोबत आहे, त्या पक्षासोबत युती करायची नाही हे आमचं ठरलेलं आहे. आम्ही अशा पक्षांसोबत कधी गेलो नाही. याची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आहे. विरोधकांचा विरोधक आपला मित्र हे सूत्रं राजकारणात असतं.
पण आमचं भाजप आणि संघासोबत व्यवस्थेचं भांडण आहे. जी व्यवस्था आम्ही उद्ध्वस्त केली. तीच भाजप आणू पाहत आहे. त्यामुळे आम्ही भाजप सोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आमचं तात्त्विक भांडण आहे, असं आंबेडकर म्हणाले.
आम्ही शिवसेनेसोबत जाणार आहोत. युतीबाबत शिवसेनेशी चर्चा झाली आहे. जागा वाटप ठरलं आहे. फक्त उद्धव ठाकरे यांनी ते जाहीर करायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. शिंदेंसोबत सतत भेट होईल. पण राजकीयच भेट असेल असं नाही. भाजप सोडली तर शिंदे सोबत जाऊ, असंही त्यांनी सांगितलं.
इंदू मिल स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचं एक ओपिनियन आलं नाही. नोएडाला जाईल तेव्हा या पुतळ्याची प्रतिकृती बरोबर आहे नाही पाहणार आहे. गेल्या सरकारने जे स्वीकारलं नाही. महाविकास आघाडी किंवा त्या आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने एक गोष्ट स्वीकारली नव्हती.
ती म्हणजे स्मारकात एक इंटरनॅशनल सेंटर असावं. त्याबाबत सात जणांची नावे मी दिली होती. त्यांच्या तीन बैठका झाल्या. त्याचं काही प्रारुप तयार करण्यात आलं होतं. ते मला जसं पाहिजे आहे की नाही त्या मसुद्यावर काल चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली.