मराठ्यांच्या मागण्यांसाठी राज्यभर वणवा पेटेल : प्रवीण दरेकर
भाजप नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांची भेट घेतली.
मुंबई : भाजप नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांची भेट घेतली. संबंधित आंदोलक निवड होऊनही नियुक्ती न झाल्यानं मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दरेकर यांनी दुसऱ्यांदा मराठा आंदोलकांची दुसऱ्यांदा भेट घेतली (Pravin Darekar on Maratha protesters). यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी ठाकरे सरकारला मराठा आंदोलकांच्या मागण्यांसाठी राज्यभर वणवा पेटेल, असा इशारा दिला. तसेच उद्धव ठाकरे यांना मराठा तरुणांची काळजी नसल्याचाही आरोप दरेकर यांनी यावेळी केला.
प्रविण दरेकर म्हणाले, “हे आघाडी सरकार नाही, टाळाटाळ सरकार आहे. 40 दिवस मराठा तरुण आंदोलन करत आहेत, पण सरकारला त्यांची किव येत नाही. कोणतीच कायद्याची अडचण नाही. कायद्याच्या चौकटीत आम्ही आरक्षण दिलं आहे, पण सरकारला आरक्षण द्यायचं नाही. उद्धव ठाकरे म्हणतात की तब्येत ठिक नाही. अरे हे तरुण आजारी पडतात, रुग्णालयात जातात. यानंतरही सरकारला त्यांना भेटायला वेळ नाही. याविरोधात उद्यापासून आम्ही प्रखर भूमिका घेणार आहे. राज्यभर वणवा पेटेल.”
राज्यभरात आंदोलन करु, रस्त्यावर उतरु आणि सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणू. हे सरकार मराठ्यांचा बळी जावो अशा पद्धतीनं काम करतंय. जर आंदोलनात कुणाचा जीव गेला, तर आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंना मराठा तरुणांची काळजी नाही, हे धक्कादायक आहे. याविरोधात राज्यव्यापी आंदोलन करुन सरकारला जाब विचारु. मराठ्याच्या रागात महाविकास आघाडी वाहून जाईल, असंही दरेकर म्हणाले.
“श्रेयवादाचं राजकारण चुकीचं”
प्रविण दरेकर म्हणाले, “उद्धव ठाकरे अयोध्येत म्हणतात त्यांनी भाजप सोडली. अरे शिवसेनेनं हिंदुत्वाची किंमत केली नाही. आम्हाला 105 जागा मिळाल्या. आम्हीच सत्तेचे खरे दावेदार होतो, पण त्यांनी सत्तेसाठी धोका दिला. त्यांनी हिंदुत्व सोडलं. एक कोटींचा विषय महत्वाचा नाही. कुणी अयोध्येला गेलं की नाही, हे देखिल महत्वाचं नाही. कुणी जर श्रेयवादाचं राजकारण करत असेल, तर ते चुकीचं आहे.”
मुस्लीम आरक्षणावर उद्धव ठाकरे यांची पोलखोल होईल, या भितीपोटीच त्यांनी पळवाट शोधली आणि उत्तर देणं टाळल्याचाही आरोप प्रविण दरेकर यांनी केला.
Pravin Darekar on Maratha protesters