राज ठाकरेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात; 3 तारखेच्या अल्टीमेटमवर मनसे ठाम – नांदगावकर
एक मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची येत्या एक मे रोजी औरंगाबादेत (Aurangabad) सभा होणार आहे. ही सभा सुरुवातीपासूनच वादात सापडली होती. सभेला पोलीस परवानगी देणार का याबाबत देखील शंका होती. अखेर राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला परवानगी मिळाल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. एक मे रोजी राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची तयारी पूर्ण झाली असून, रेकॉर्ड ब्रेक म्हणजे मागचा गर्दीचा सर्व रेकॉर्ड तोडणारी ही सभा असेल असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी म्हटले आहे. तयारी अंतिम टप्प्यात असून, उद्या राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होणार असल्याची माहिती देखील यावेळी नांदगावकर यांनी दिली आहे.
काय म्हणाले नांदगावकर?
राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही सभा रेकॉर्ड ब्रेक म्हणजे मागील सर्व रेकॉर्ड तोडणारी असेल. उद्या राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत. ते उद्या मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये देखील सभेचा उत्साह दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान त्यापूर्वी आज अमित ठाकरे देखील औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते आज सभेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. ते सभा स्थळाची देखील पहाणी करणार आहेत.
3 तारखेच्या अल्टीमेटमवर ठाम
पुढे बोलताना नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा हाती घेतला आहे. हा सामाजिक मुद्दा आहे. राज ठाकरेंची भूमिका ही सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी नसते. मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी तीन मेचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. तीन तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत अशी मागणी देखील यावेळी नांदगावकर यांनी केली आहे.