बेस्ट 10 लाख ग्राहकांच्या माथी मारणार प्रीपेड वीज मीटर, खाजगी कंपनीला फायदा देणारा निर्णय ?
मुळात तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला स्मार्ट मीटर्सचा भार सोसणार आहे का ? अदानी इलेक्ट्रीसिटीला स्मार्ट मीटरच्या मेन्टेनन्सचे दहा वर्षांचे कंत्राट देण्यात आले आहे.
मुंबई | 28 जुलै 2023 : मुंबईच्या बेस्टच्या वीज वितरण मार्फत मुंबईतील साडे दहा लाख वीज ग्राहकांच्या माथी प्रीपेड स्मार्टमीटर्स बसविण्याची योजना बेस्ट उपक्रमाने आणली आहे. या वीज मीटरमुळे सर्व सामान्य ग्राहकांना फटका बसणार आहेच. शिवाय तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमावर देखील भार येणार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी केला आहे.
मुंबई शहराला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट अंडरटेकिंग उपक्रमाने स्मार्ट वीज मीटर्स म्हणून येत्या सप्टेंबरपासून मुंबई शहरात अदानी इलेक्ट्रीकल कंपनीची नवी स्मार्ट मीटर्स बसविण्याचा निर्णय बेस्टने घेतला असल्याचे कॉंग्रेसचे नगरसेवक रवी राजा यांनी केला आहे. ही वीज मीटर बसविणे सर्व वीज ग्राहकांना बंधनकारक आहे. या मीटर्सची किंमत तब्बल 9,500 रुपये प्रती मीटर इतकी जास्त अशी आहे. या मीटरच्या खरेदीसाठी केंद्र सरकार 1300 रुपये देणार आहे. उरलेले पैसे बेस्ट उपक्रम सोसणार आहे. हे कंत्राट सुमारे 1300 कोटी रुपयाचे आहे. मुळात तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला इतका भार सोसणार आहे का ? या कंपनीला मीटरच्या मेन्टेनन्सचे दहा वर्षांचे कंत्राट देण्यात आले आहे.
प्रीपेड मीटर्स धोकादायक
ही नवीन मीटर्स प्रीपेड असणार आहेत हा यातील सर्वात मोठा धोका आहे. कारण मुंबई शहरात 10.50 लाख बेस्टचे ग्राहक आहेत. त्यातील 40 टक्के ग्राहक हे झोपडपट्टी मध्ये राहणारे आहेत. तर 30 टक्के ग्राहक मध्यमवर्गीय नोकरदार मंडळी आहेत. प्रीपेड मीटरची कल्पना ही धोकादायक आहे. ज्याचं आयुष्यच दर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणाऱ्या पगारावर अवलंबून आहे. अशा लोकांना प्रीपेड मीटरचा बॅलन्स संपल्यावर रिचार्ज करेपर्यंत अंधारात राहवं लागणार आहे. हा ग्राहकांवर अन्याय असून कंपनीच्या फायद्यासाठी हे केलं जात असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. ही प्रीपेड मीटर मुंबईकरांवर आर्थिक बोजा ठरणार असून त्याची सक्ती करायला नको असे नगरसेवक रवी राजा यांनी म्हटले आहे