बापासाठी लेक मैदानात, आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का?; प्रिया सरवणकरांच्या अमित ठाकरेंना सवाल
Priya Sada Sarvankar on Amit Thackeray : सदा सरवणकर यांची लेक प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जाहीर सभेत बोलताना प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरे यांचं कर्तृत्व काय? असा सवाल केला आहे. प्रिया सरवणकर यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर...
मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर आणि मनसेचे नेते अमित राज ठाकरे यांच्यात ही लढत होत आहे. या जागेवर कोण जिंकणार? याकडे मतदारांचं लक्ष आहे. प्रचार सध्या जोरात सुरु आहे. ठिकठिकाणी प्रचार रॅली निघत आहेत. प्रचार सभा होत आहेत. आजच्या सभेत सदा सरवणकर यांची लेक प्रिया सरवणकर यांनी प्रचारसभेत बोलताना अमित ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का?, असा थेट सवाल प्रिया सरवणकर यांनी केला आहे.
अमित ठाकरेंवर निशाणा
ज्या गल्लीत उभा आहे. त्या गल्लीतील पाच समस्या काय आहेत? हे त्यांना सांगता येणार नाही, तो नवीन चेहरा. हवाय का तुम्हाला? त्यांनी प्रमोशनच असं केलंय की नवा फ्रेश चेहरा… नेता म्हटलं की त्याला कर्तृत्व हवं, वक्तृत्व हवं, नेतृत्व हवं. माझा त्यांना प्रश्न आहे की काय कर्तृत्व? आडनाव हा कर्तृत्व असू शकतं का?, असा थेट सवाल प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरे यांना केला आहे.
सरवणकरसाहेब काहीतरी पदावर आहेत. त्यांचं कर्तृत्व, त्यांनी केलंय का? कधी दिसलं का? फक्त हातवारे केले म्हणजे कुणी आमदार नाही होत. करणार का त्यांना आमदार? देणार का त्यांना साथ?, असाही सवाल प्रिया यांनी विचारला आहे.
समाधान सरवणकर यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त
सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनीही अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित ठाकरे यांनी चित्रपटांमध्ये काम करावं. अमित ठाकरे हे दादर माहिमचे सेलिब्रिटी आहेत. तुमच्याकडे वक्तृत्व नाही. ज्यांचं काय कर्तुत्व नाही केवळ पॅराशूट लँड झाल्यासारखं त्यांना तिकीट दिलेला आहे. पॅराशूट पॉलिटिक्सला जनता भुलणार नाही. दादर माहिममध्ये फक्त आणि फक्त सदा सरवणकर यांच्यात मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे. जनता आमच्या सोबत आहे. आम्ही जनतेची पाच वर्षे काम केलेली आहेत. दादर माहिममध्ये विजयाचा गुलाल शिवसेनाच उधळणार आहे, असं विश्वास समाधान सरवणकर यांनी व्यक्त केलाय.