Rahul Gandhi Ed Enquiry : राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, भाजपची उलटी गिनती सुरू, नाना पटोलेंचा इशारा
ब्रिटीश सत्तेला नामोहरम करून पळून लावणारा काँग्रेस पक्ष इंग्रजांच्या हस्तकांच्या या दडपशाहीला भीक घालणार नाही. राहुलजी गांधी यांच्यावरील कारवाई म्हणजे भाजपाची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची गेल्या तीन दिवसांपासून ईडी चौकशी (Ed Enquiry) सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही ईडीने केलेली चौकशी ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून करण्यात आली आहे. गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे, काँग्रेस पक्ष अशा दडपशाहीला घाबरत नाही. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून भाजपने (BJP) दिल्लीत काँग्रेसचे नेते, खासदार, पदाधिकारी यांच्यावर अत्याचार चालवला आहे. पण ब्रिटीश सत्तेला नामोहरम करून पळून लावणारा काँग्रेस पक्ष इंग्रजांच्या हस्तकांच्या या दडपशाहीला भीक घालणार नाही. राहुलजी गांधी यांच्यावरील कारवाई म्हणजे भाजपाची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, देशात अत्यंत भयानक परिस्थिती आहे. सुडाने पेटून उठलेल्या भारतीय जनता पक्षाचे सरकार दिल्लीत सत्याग्रहासाठी आलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार यांच्यावरही हल्ले करत आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घुसून तेथील नेत्यांनाही मारहाण करण्यात आली. इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात आहे पंरतु काँग्रेस पक्ष बलाढ्य अशा इंग्रज सत्तेला घाबरला नाही उलट त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. तेव्हा ब्रिटिंशाविरोधात लढलो आता ब्रिटिशांच्या हस्तकांविरोधात लढत आहोत, आम्ही यांना घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसचा आवाज दडपण्यासाठी ही कारवाई
राहुलजी गांधी आपल्या जीवाची पर्वा न करता केंद्रातील सरकारविरोधात जनतेचे प्रश्न घेऊन सातत्याने जाब विचारत आहेत. राहुलजी गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकार व भाजपाकडे उत्तर नाही म्हणून त्यांचा आवाज दडपण्यासाठी ही कारवाई करत आहेत. केंद्र सरकारच्या या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार दिनांक 16 जून रोजी राजभवनसमोर आंदोलन करणार आहे तर परवा 17 तारखेला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करून भाजपा सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
नेते, पत्रकारांना घरात घुसून मारहाण
याचबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राजभवनवर केल्या जाणाऱ्या आंदोलनातून लोकांची जनभावना राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकारला कळावी यासाठी केले जात आहे. देशात सध्या आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. केंद्रातील सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घूसून काँग्रेस नेते व पत्रकारांना मारहाण केली, कलम 144 लावले आहे. कोणत्याही कार्यालयात कलम 144 कसे काय लागू शकते, असा प्रश्न उपस्थित करून न्यायालयाने याची दखल घेऊन चौकशी केली पाहिजे.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरले आहे. राहुलजी गांधी यांनी अर्थव्यवस्था, कोरोना, बेरोजगारी, केंद्राच्या लोकविरोधी धोरणांव सातत्याने टीका करून प्रश्न विचारले, त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या मंत्र्यांना देता आले नाही त्यामुळे त्यांना ईडीची नोटीस पाठवून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि देशातील जनता राहुल गांधीजींच्या सोबत आहे. आम्ही राहुलजींच्या नेतृत्वाखाली संघर्ष करू आणि भाजपच्या हुकुमशाहीला नमवू, असा इशारा यावेळी थोरात यांनी दिला आहे.
काँग्रेसचे आंदोलन आणि घोषणाबाजी
पत्रकार परिषदेनंतर नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी रिगल सिनेमाजवळ रस्त्यावर उतरून आंदोलन करून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारविरोधातील काँग्रेसचे हे आंदोलन सुरुच राहणार असून गुरुवारी राजभवनावर आंदोलन करणार आहे तर शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी आंदोलन करणार आहे.