Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्या परभणी दौरा; सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटणार, बीडमधील मस्सीजोगमध्ये जाण्याची शक्यता
Rahul Gandhi visit to Parbhani tomorrow : उद्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणी दौर्यावर येत आहेत.न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ते भेट देतील. तर बीड जिल्ह्यातील मस्सीजोगमध्ये ते देशमुख कुटुंबियांना भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात येत आहेत. ते सोमवारी परभणीत येत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी गांधी परभणी दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट देणार आहेत. परभणीतील हिंसाचारानंतर विविध नेत्यांनी परभणीला भेट दिली आहे. काल ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली होती. तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात ते बीड जिल्ह्यातील मस्सीजोगमध्ये जाण्याची पण शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या दौर्यात अजून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
असा आहे दौरा
सोमवारी 23 डिसेंबर रोजी राहुल गांधी दिल्ली येथून नांदेड येथे विमानाने येथील. दुपारी पावणेतीन वाजता ते परभणीत दाखल होतील. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी ते जातील. कुटुंबियांशी संवाद साधतील आणि त्यांचे सांत्वन करतील. तर दुपारी साडेतीन वाजता नांदेड विमानतळावरून ते दिल्लीला रवाना होतील, अशी माहिती समोर येत आहे. तर या दौऱ्यादरम्यान ते मस्साजोग येथे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं कारण काय?
10 डिसेंबर रोजी एका व्यक्तीने परभणी जिल्हा रेल्वे स्थानकाजवळ संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्याने हिंसाचार उसळला. परभणी बंदची हाक देण्यात आली. बंद दरम्यान आक्रमक तरुणांनी वाहनांची, दुकानांची तोडफोड केली. प्रकरणात पोलीसांनी दोन दिवसानंतर 12 डिसेंबर रोजी सोमनाथ याच्यासह 300 लोकांना ताब्यात घेतले होते. तर 72 तासानंतर न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर सूर्यवंशीने छातीत दुखत असल्याचे सांगीतल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे आणि त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तर सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात अनेक जखमा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे म्हटलं आहे. राज्य शासनाने या प्रकरणात सूर्यवंशीच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या सर्व घडामोडीनंतर आता राहुल गांधी हे या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी परभणीत येत आहेत.