भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची ताटं उचलण्याचं काम करणं, एवढंच राज ठाकरेंच्या भाषणात…
आंदोलनं ही सेटींग करायची आणि त्यातून पळपुटेपणा काढायचे धोरण मनसे राज ठाकरे यांचे कर्तृत्व असल्याचा टोलाही त्यांना लगावण्यात आला.
मुंबईः राज ठाकरे यांच्या सभेनंतर त्यांच्यावर आता काँग्रेससह ठाकरे गटाच्या नेत्यानी निशाणा साधला आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार प्रहार केले जात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये एवढी पडझड होऊनसुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ज्या ताकदीने उभा राहिले आहेत. हा द्वेष आणि त्यांच्याबद्दल कलुक्षित मनं लक्षात ठेवून घेतलेला आजचे राज ठाकरे यांचे आजचे भाषण होते असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेनेला लक्ष्य करणे, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची ताटं उचलण्याचे काम करणं यापलीकडे राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये कोणताही नवीन मुद्दा नव्हता असंही त्यांनी आज सांगितले.
उद्धव ठाकरे यांची केलेली नक्कल ही आजची राज ठाकरे यांनी केलेली करमणूक होती असा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला आहे. मात्र हे असे असले तरी राज ठाकरे यांना लोकं कधीच स्वीकारणार नाहीत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलत असताना त्यांची जीभ तुरुतुरु चालत होती शिवसैनिकांनी ते मनावर नक्कीच घेतलेला आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
राज ठाकरे यांनी केलेल्या भोंग्याच्या राजकारणवरूनही त्यांनी त्यांना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी असे किती भोंगे उतरवले आहेत असा त्यांना प्रतिसवालही करण्यात आला.
त्यांच्या आंदोलनं ही सेटींग करायची आणि त्यातून पळपुटेपणा काढायचे धोरण मनसे राज ठाकरे यांचे कर्तृत्व असल्याचा टोलाही त्यांना लगावण्यात आला.
शिवसेनेचा मुकाबला हे एकटा करू शकत नाही म्हणून भाजपनी हे हौसे नवशे गवसे घेतलेले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना जिंकून येईल.
यासाठी आमचं राज ठाकरेंसहित भाजपच्या शिंदे सरकारलाही आवाहन आहे की हिम्मत असेल तर या महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लावा असा इशाराही ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.
राज ठाकरेंची तोफ छत्रपतींचे अवमान करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात उठेल परंतु खूपच पुचाट धोरण राज ठाकरे यांनी राज्यपालाच्या विरोधात स्वीकारले आहे अशी खरमरीत टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका होत असली तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष हा आता विजयाकडे झेप घेत आहे त्याला कोणीही थांबवू शकणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांची विचारपूस करायला या मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही.
पण स्वतःचा हात ज्योतिषाकडे दाखवण्यासाठी आणि कामाख्या देवीकडे जायला होम हवन करायला त्यांना वेळ आहे. शेतकरी मेला तरी चालेल पण माझा हात चांगला राहिला पाहिजे अशी भूमिका या मुख्यमंत्र्याची आहे असा टोला त्यांना लगावण्यात आला आहे.