Raj Thackeray | मशिदीवरील भोंग्यावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले दोन पर्याय, नाही तर…
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न मांडला. मागच्या सरकारमध्ये महाराष्ट्र सैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. तसेच एकनाथ शिंदे सरकारला दोन पर्याय दिले.
मुंबई : राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा आणि हिंदुत्ववादी भूमिका हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम मशिदीवरील भोंग्याचा विषय हाती घेतला होता. गु़ढीपाडवा मेळाव्यातही राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय पुन्हा एकदा व्यासपीठावरून मांडला. अजूनही भोंग्याचा विषय संपलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारनं यात लक्ष घालावं अशी विनंती त्यांनी केली.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगायचं आहे की, तुमच्याकडे धनुष्यबाण चिन्ह आलं आहे. तुमच्याकडे शिवसेना हे नाव आलं आहे. तुम्ही सांगता तुमच्या नसानसात बाळासाहेबांचे विचार आहेत. मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे, गेल्या गुढीपाडव्याला आम्ही जे सांगितलं होतं की मशिदीवरील भोंगे बंद करा. गेल्या सरकारमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर 17 हजार गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे पहिल्यांदा मागे घ्या.”, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
“दुसरं, एकतर तुम्ही सांगा लाउडस्पीकर बंद करा, अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. आम्ही लाउडस्पीकर बंद करतो. दोन पैकी एक निर्णय एकनाथ शिंदे सरकारला घ्यावाच लागेल. गेल्या काही दिवसात मशिदीवरील भोंगे पुन्हा मोठ्या वाजू लागले आहेत. मी विषय सोडलेला नाही. मी विषय सोडणार नाही. मी पुन्हा यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार. मी मुद्दामून तुमच्या साक्षीने हा मुद्दा येथे काढला.त्यासाठी मी परत जाऊन भेटणार.”, असं आवाहन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं.
“दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर नवीन हाजीअली तयार करणार? आता प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस कमिश्नर, महापालिका आयुक्तांना आजच सांगतो महिन्याभरात कारवाई झाली नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपती मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाहीत. वाट्टेल ते फाजील चाळे चालणार नाही. एकदा माझ्याकडे राज्य आलं तर अख्खं राज्य सुतासारखं सरळ करेन. परत कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही.”, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
“मला काल विचारलं तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? आजचा हिंदू नववर्ष. माझ्या हिंदुत्वात मला धर्मांध हिंदुत्व नको. धर्माभिमानी हिंदू हवाय. जो इतर धर्मांचाही मान राखेल. मला मुस्लिम धर्मातीलही माणसं पाहिजेत. मला जावेद अख्तर साहेबांसारखे माणसं पाहिजे. त्यांनी पाकिस्तानात जावून खडेबोल सुनावलं. द्वेषाने बघण्यासारखं नसतं. पण जिथे कुरापती काढल्या जातात तिथे त्याच पद्धतीने उत्तर द्यायला हवा. मला अपेक्षित असलेला मुसलमान पाकिस्तानला खडेबोल सुनावणारा पाहिजे.”, असंही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.