मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीला चाप लावण्याची मागणी केली आहे. कोरोनामुळे महिलांचं कर्ज माफ करण्याबाबत सरकारनं पावलं उचलावीत. मायक्रो फायनान्स कंपन्या विम्याची कागदपत्रं महिलांना देत नाहीत. यामुद्यांकडे लक्ष देण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे. (Raj Thackeray letter to Uddhav Thackeray about micro finance companies behavior )
राज ठाकरेंनी पत्रामध्ये , महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय करणं आणि त्याचा विस्तार करणं ही नित्याची बाब आहे. कर्ज घेणाऱ्या माता-भगिनींनी कर्जाचा हप्ता चुकवण्यात कधीच दिरंगाई केलेली नाही. प्रसंगी पोटाला चिमटा काढला असेल पण हप्ते वेळेत भरले आहेत. पण, मार्च २०२० पासून कोरोनामुळे केलेलं लॉकडाऊन आणि त्यातून निर्माण झालेलं आर्थिक आरिष्ट ह्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे व्यवसाय जवळपास ठप्प आहेत. त्यामुळे अर्थातच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले. पण या परिस्थितीचा कसलाही विचार न करता मायक्रो फायनान्स कंपन्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात दंडेलशाही सुरु केली असल्याचे पत्राद्वारे निदर्शनास आणले आहे.
कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे, त्याचा चारचौघांच्यात अपमान करणे असले प्रकार सर्रास सुरु आहेत. या विषयीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीवर सरकारने अंकुश ठेवायला हवा, कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार या कंपन्यांना कोणी दिला?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. हा विषय गंभीर आहे आणि हे जर असंच सुरु राहिलं तर याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम गंभीर असतील हे सरकारने लक्षात ठेवावे, असे ठाकरेंनी म्हटले. यामुळे सरकार म्हणून आता जागे व्हा आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवा, अशी मागणी राज ठाकरेंनी केलीय.
मायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप लावण्याचे काम सरकार कडून होणार नसेल तर महाराष्ट्र सैनिक त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
महिलांचं कर्ज माफ करण्याची मागणी
ग्रामीण अर्थव्यवस्थाच गेले ६ महिने ठप्प आहे. अर्थव्यवस्थेला उभारी येण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. त्यामुळे ह्या माता-भगिनी कर्जाचे हप्ते भरू शकतील याची शक्यता नाही, त्यामुळे या महिलांचं कर्ज माफ करण्यासाठी सरकारने पाऊलं उचलावीत, अशी मागणी देखील राज ठाकरेंनी केली.
मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून विम्याची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ
मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बचत गटाच्या महिलांकडून विमा उतरवतो असे सांगून त्या विम्याचा हप्ता गोळा केला आहे. व्यवसाय ठप्प आणि कर्जाचे हप्ते देणं या महिलांना शक्य नाही अशा वेळेस महिला विमा पॉलिसीची मागणी करत आहेत. मात्र, मायक्रो फायनान्स कंपन्या विम्याचे कागदपत्रं देत नाहीत. यामुळे माता-भगिनींनी जरी विम्याची रक्कम अदा केली असली तरी विमाच उतरवला गेला नाही, अशी शंका येतेय, अशी शंका राज ठाकरेंनी व्यक्त केली. महिलांना विम्याची कागदपत्रं आणि विमा कवचाचा लाभ देखील मिळायलाच हवा, असे राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
Raj Thackeray Tennis | टेनिसचा आनंद लुटताना ‘राज’स मुद्रा, राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा
…तर तुम्ही काहीही करू शकणार नाही; राज ठाकरेंची मूर्तीकारांना धोक्याची सूचना
(Raj Thackeray letter to Uddhav Thackeray about micro finance companies behavior )