Raj Thackeray Speech : बेरोजगारी-महागाई विसरून राज ठाकरेंनी सेटलमेंट केली? यशोमती ठाकूर यांचा खोचक सवाल
आता काँग्रेसनेही राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा त्याच स्टाईलने समाचार घेतला आहे. काँग्रेस नेत्या यशमोमती ठाकूर (Yashomati thakur) यांनी राज ठाकरे यांना काही खोचक सवाल करत टीका केली आहे.
मुंबई : शनिवारच्या राज ठाकरे (Raj Thackeray Speech) यांच्या भाषणाने जोरदार रान पेटवलं आहे. राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्याबाबत (Mosque Loud Speaker) घेतलेल्या भूमिकेवरून तर अनेकजण जोरदार निशाणा साधत आहेत. आता काँग्रेसनेही राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा त्याच स्टाईलने समाचार घेतला आहे. काँग्रेस नेत्या यशमोमती ठाकूर (Yashomati thakur) यांनी राज ठाकरे यांना काही खोचक सवाल करत टीका केली आहे. राजकारणात सातत्याने येणार्या अपयशामुळे राज ठाकरे हे खचून गेले असून त्यांची वाटचाल आता धर्मांधतेच्या दिशेने सुरू आहे. राज ठाकरे यांनी विकासाच्या छाताडावर बसून धर्माचा झेंडा फडकवायचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र यामुळे केवळ विकृत राजकारण जन्माला येईल, पण त्यांना यश मिळणार नाही. कारण देशातील खरे प्रश्न हे महागाई आणि बेरोजगारी आहेत, अशा खोचक शब्दात राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज ठाकरे यांना सणसणीत टोला लगावला आहे.
पुरोगामी महाराष्ट्रातून हे अपेक्षित नाही
राज ठाकरेंसारखे नेते महाराष्ट्राशी एवढं खोटे कसे काय बोलू शकतात. त्यांच्यात काही सेटलमेंट झाली का ? असे प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केले. आपल्या पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्रातून निदान मराठी नवं वर्षाच्या दिवशी तेही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असलेल्या मैदानातून तरी अशी सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य होणे अपेक्षित नाही, असेही ठाकूर म्हणाल्या.
खरे प्रश्न विसरलात का?
गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी केलेल्या मेळाव्यातील भाषणावर प्रतिक्रिया देत ठाकूर यांनी जोरदार टीका केली आहे. मशिदीवरील भोंगे उतरविण्यातबाबत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला असला, तरी यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते. धार्मिक विष अधिक वेगाने पसरवले जाऊ शकते. राज ठाकरे यांची वाटचाल आता भाजपची बी टीम म्हणून होते आहे का? हा खरा प्रश्न आहे. कारण देशाला खरा धोका राज ठाकरेंच्या मागे ED लावणाऱ्यांपासून आहे. निवडणूकांनंतर एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि गगनाला भिडलेली महागाई हे खरे प्रश्न आहेत. हे तरुणाईचे नेते असलेले राज ठाकरे विसरले वाटतं. या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत राज ठाकरे यांनी दिलेली धर्मांधतेची हाक ही राज्यासह देशात सामाजिक विध्वंस निर्माण करणारी ठरणार आहे. राजकीय नैराश्यातून राज ठाकरे यांनी ब्ल्यू प्रिंट काढत सुरू केलेला विकासाचा मार्ग आता विनाशाच्या मार्गाकडे सुरू आहे, अशी तिखट प्रतिक्रिया ठाकूर यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.