Video | Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : प्राणप्रतिष्ठेचे ते 84 सेकंद, बॉलिवूडकर, उद्योगपती, खेळाडू सर्वांची उपस्थिती
12 वाजून 29 मिनिटं आणि 8 सेकंदापासून 12 वाजून 30 मिनिटं आणि 32 सेकंदांपर्यंत खास 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त होता.
मुंबई : अयोध्येत रामलल्ला आलेत, असंख्य राम भक्तांचं भव्य दिव्य राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 12 वाजून 29 मिनिटांनी सुरु झालेला 84 सेकंदांचा मुहूर्त साधत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि अयोध्येच्या भव्य राम मंदिरात श्रीराम विराजमान झाले. ठिक 12 वाजून 05 मिनिटांनी पंतप्रधान मोदी पारंपरिक वेशभूषेत मंदिरात दाखल झाले. लाल रंगाची चोळी आणि चांदीचं छत्र घेऊन मोदींनी मंदिरात प्रवेश केला. प्रत्यक्ष मोदी मंदिरात आल्यानंतर कॅमेऱ्यात मंदिराची भव्यताही कैद झाली. मंदिरात दाखल होताच, मोदींच्या हस्ते विधीवत पूजा सुरु झाली.
आधी गणेशपूजन झालं नंतर जुन्या रामलल्लांच्या मूर्तीची पूजा झाली. आणि त्यानंतर नव्या बाल रुपातल्या सुंदर, मनमोहून टाकणाऱ्या राम लल्लांच्या मूर्तीची मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. 12 वाजून 29 मिनिटं आणि 8 सेकंदापासून 12 वाजून 30 मिनिटं आणि 32 सेकंदांपर्यंत खास 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त होता. शुभू मुहूर्ताला सुरुवात होताच राम लल्लांची सजलेली मूर्ती दृष्टीक्षेपात पडली आणि राम भक्तांही सुखावले.
पाहा व्हिडीओ:-
डोक्यावर स्वर्ण मुकूट डाव्या हातात सोन्याचा धनुष्य तर उजव्या हातात सोन्याचा बाण आहे. रत्नजडित अलंकार जिवंत वाटणाऱ्या डोळ्यांमधलं तेज आणि रामलल्लांच्या चेहऱ्यांवरील स्मित हास्य प्रभू श्रीरामांचं अलौकिक दिव्य रुप साकारणारे हात कर्नाटकातल्या म्हैसूरचे आहेत. कर्नाटकच्या म्हैसूरचे मूर्तीकार अरुण योगीराज यांनी ही आकर्षक मूर्ती साकारलीय. शाळीग्राम दगडात 51 इंचाच्या आकृतीत योगीराज यांनी प्रभू रामलल्लांना साकारलंय. योगीराज यांनीही अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं उपस्थिती लावली.एकीकडे मोदींच्या हस्ते मंदिरात प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली..त्याचवेळी मंदिरावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झाली.
प्रभू श्रीराम विधीवत विराजमान होताच, श्रीरामाचं दर्शनही सुरु झालं. देशभरातून जे प्रमुख पाहुणे अयोध्येत आले, त्या सर्वांनी रामल्लांचं दर्शन घेतलं. अयोध्येत दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रजनीकांत, कतरिना कैफ, विकी कौशल, कंगना रनौत. दक्षिणेतले स्टार रामचरण, सायना नेहवाल, मिताली राजसह दिग्गजांनी हजर राहून, याची देही याचा डोळा प्राण प्रतिष्ठेचा सोहळा अनुभवला. भाषण झाल्यावर पंतप्रधान मोदींनी या सेलिब्रिटींची भेट भेट घेतली. राम भक्तांचं वर्षानुवर्षाचं स्वप्न पूर्ण झालंय. भव्य दिव्य मंदिर साकारणाऱ्या इंजिनिअर्स आणि कामगारांच्या पाठीवरही, मोदींनी कौतुकाची थाप मारली. स्वत: मोदींनी पुष्पवृष्टी करत कामगारांचं स्वागत केलंय.