पुणे : मुख्यमंत्रिपदावरून शनिवारी राज ठाकरे (Raj Thackeray Speech) यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर आता रामदास आठवले (Ramdas Athawle) यांनीही राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला आहे. भारतीय जनता पक्षासोबत सेनेने (Shivsena) निवडणूक लढवली पण नंतर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. आशा खरपूस शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सेनेवर टीका केली.राज ठाकरे यांनी पडावा मेळाव्यात शिवसेनेवर केलेल्या टिकेलाही आमचा पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले. पिंपरी चिंचवड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येणाऱ्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही युती करणार असल्याचे सांगतानाच मुंबईतून शिवसेनेच्या हातातून सत्ता घेण्याचं आमचे लक्ष्य असल्याचं त्यांनी म्हंटलंय.या वेळी भाजप आणि आर पी आय एकत्र येऊन मुम्बईत शिवसेनेला मोठा धक्का देण्याचे उद्दिष्ट्य असल्याचेही आठवले म्हणाले. लोकांच्या मनात नरेंद्र मोदी आहेत त्याचमुळे चार राज्यात भाजपचा विजय झालाय. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे 2024 मध्ये 400 हुन अधिक एनडीए जागा जिंकेल असा दावा आठवले यांनी केला.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जातीयवादी पक्ष म्हंटले आहे, त्याचा अर्थ शरद पवार जातीयवाद करतात असा नाही, पण त्यांच्या खालचे नेते मात्र जातीयवाद करतात हे भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीच्या वेळी स्पष्ट झाले आहे, असं रामदास आठवले यांनी म्हंटलंय.राज ठाकरे यांना बरोबर घेण्याची भाजपला आवश्यकता नाही, त्याला आमचा विरोध आहे, राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण त्यांना मत मिळत नाहीत, त्यांना बरोबर घेतल्यास भाजपला तोटा होईल , त्यांची भूमिका देशपातळीवर भाजपला सोयीची नाही, त्यामुळं त्यांना बरोबर घेण्याची गरज नाही त्याला आमचा विरोध आहे, असं ही ते म्हणाले.
हिंदुंनी मंदिरात भोंगा लावन्याला विरोध नाही, पण जाणीवपूर्वक मशिदी पुढे भोंगे लावून तणाव निर्माण करू नये, मशिदी वरून भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेला मात्र विरोध असल्याच आठवले यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार देश हिंदुत्ववाद करण्याचा प्रयत्न करतायेत, या आरोपात तथ्य नाही, मोदी यांनी मुस्लिम, ख्रिश्चन समाजाला ही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांचा अजेंडा विकासाचा आहे, तीन तलाकचा कायदा रद्द केल्यानंतर मुस्लिम महिलांनी मोदी यांना पाठिंबा दिलाय, त्यामुळे ते फक्त हिंदूसाठी काम करतात असं नाही असेही ते म्हणाले.वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी एकत्र आले तर मोठी ताकत उभा करता येईल, बाळासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व्हाव्हे , त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका लढू, मात्र वंचितचा प्रयोग महाराष्ट्रात चालणार नाही असंही ते म्हणाले.