Ravi Rana : रावणाचा अहंकार टिकला नाही, तिथे उद्धव ठाकरेंचा काय टिकणार? आम्हाला फसवलं म्हणत रवी राणांची उद्धव ठाकरेंवर टीका
रावणाचाही (Ravan) अहंकार टिकला नाही. मग उद्धव ठाकरेंचा काय टिकणार? आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. जय श्रीराम म्हणणे गुन्हा आहे का, असा सवाल आमदार रवी राणा यांनी केला आहे.
मुंबई : रावणाचा अहंकार टिकला नाही, तिथे उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) काय टिकणार, अशी टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आम्हाला फसवले, अशी टीका आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. वांद्रे कोर्टाने हा निर्णय दिला, त्यानंतर टीव्ही 9च्या प्रतिनिधीने त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले, की रावणाचाही (Ravan) अहंकार टिकला नाही. मग उद्धव ठाकरेंचा काय टिकणार? आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. जय श्रीराम म्हणणे गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी यावेळी गाडीच्या काचा बंद केल्या. त्यामुळे रवी राणा नंतर काय म्हणाले, हे समजू शकले नाही. मात्र त्यांनी घोषणा दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
न्यायालयाच्या निर्णयानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्यांची मेडिकल टेस्ट होणार आहे. दरम्यान, राणआ दाम्पत्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. वांद्रे कोर्टाचे न्यायाधीश ए. ए. घनीवाले यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी तत्काळ वांद्रे कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, 29 एप्रिल रोजी त्यांच्या जामीन अर्जावर फैसला होणारा आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यास 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे.
153 अ अंतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी रिमांड कॉपीत राणा दाम्पत्यास सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही ही मागणी लावून धरत राणा त्यांच्यावरील आरोप किती गंभीर आहेत, याची माहिती कोर्टाला दिली. तर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी ही अटकच बेकायदेशीर असल्याचे सांगत राणा दाम्पत्याच्या पोलीस कोठडीला विरोध केला. राणा दाम्पत्यावर खार पोलीस ठाण्यात 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.