मुंबई– सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court)निर्णयाने शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवरील अपात्रतेचा निर्णय 11 जुलैपर्यंत पुढे गेलेला आहे. हा महाविकास आघाडीचा (MVA)धक्का मानण्यात येतो आहे. आता एकनाथ शिंदेंसोबतचे समर्थक राज्यपालांना सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र देणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही शिवसेनेच्या नेत्यांना सत्ता राखू असा विश्वास वाटतो आहे. बंडखोर आमदारांपैकी 20 आमदार हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत, हे आमदार शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील, असा विश्वास शिवसेना नेते अनिल देसाई (Anil Desai)यांनी दावा केला आहे. दिल्लीत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर देसाई पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
बंडखोर आमदारांपैकी 20 आमदार हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे अनिल देसाई यांनी केला आहे. जर सरकारचं विश्वासमत सिद्ध करावं लागंल, तर हे आमदार शिवसेनेला मतदान करतील असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला आहे. हे आमदार गेल्या काही दिवसांपासून संपर्कात असल्याचे सांगण्यात येते आहे. या आमदारांना धमकावून तिथे नेण्यात आले आहे. त्या आमदारांना शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांशी सतत संपर्क सुरु असल्याचे सांगण्यात येते आहे. हे आमदार मुंबईत आल्यानंतर शिवसेनेत येतील. उद्या विश्वासदर्शक ठराव जर विधानभवनात आला, तर हे २० आमदार शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील असे देसाई आणि शिवसेना नेत्यांनी यापूर्वीही सांगितले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर शिवसेना नेत्यांत थोडी नाराजी दिसते आहे. या सुनावणीनंतर संजय राऊत यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्ट दिसत होता. ही कायदेशीर लढाई आहे, ही सुरुच राहील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे सुरुवातीला या बंडखोर आमदारांनी परत यावे, यासाठी प्रयत्न करत होते. त्यानंतर ते आक्रमकपणे त्यांच्यावर टीका करतानाही दिसले.
दरम्यान एकनाथ शिंदे गटाने मोठा दावा कला आहे. शिंदे यांच्यासोबतचे आमदार हीच शिवसेना असल्याचा दावा या गटाने केल्याची माहिती आहे. शिवसेनेतील इतर आमदार आमच्यासोबत आले नाहीत तर अपात्र होणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात येते आहे. असे झाल्यास उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांची भूमिका काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.