Eknath Shinde: ‘मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला’,‘एवढे सैनिक कशाला गद्दारांना गाडायला’कोल्हापुरात शिवसैनिक कडाडले
कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना इशारा दिला असून शिवसेनेत अशी किती वादळे आली आणि गेली. परंतू शिवसेनेला ‘चॅलेंज’ देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे अशा शब्दात दुधवडकर यांनी एकनाथ शिंदे यांना इशारा दिला.
कोल्हापूर : विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result 2022) कट्टर शिवसैनिक असं समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे (Shivsainik) यांच्या बंडखोरीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत 56 आमदार जे बंडखोरी करून गेले आहेत, त्या आमदारांमध्ये कोल्हापूरचे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचाही समावेश झाल्यानंतर कोल्हापूरातील शिवसैनिकही (kolhapur Shivsena Andolan) रस्त्यावर उतरत त्यांनी शिवसेनेच्या समर्थनात कोल्हापूरातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले.
कोल्हापूरातील शिवसैनिकांनी ‘मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला’,‘एवढे सैनिक कशाला गद्दारांना गाडायला’, ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणांनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला.
कोल्हापुरात असंख्य महिलाही सहभागी
शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी शिवसैनिक ठाम असल्याच्या समर्थनात आज कोल्हापुरात भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. दुपारी 12 वाजता दसरा चौकातून शिवसैनिकांच्या पदयात्रेला सुरूवात झाली. या शक्तिप्रदर्शनामध्ये कोल्हापूरातील महिलांचाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांनीही जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेचा आवाज बुलंद असल्याचेच दाखवून दिले.
‘चॅलेंज’ देणारी औलाद नाही
कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरूण दुधवाडकर यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना इशारा दिला असून शिवसेनेत अशी किती वादळे आली आणि गेली. परंतू शिवसेनेला ‘चॅलेंज’ देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे अशा शब्दात दुधवाडकर यांनी एकनाथ शिंदे यांना इशारा दिला.
आजी माजी पदाधिकारीही सहभागी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत यावेळी मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…आता हा एकोबा गेला
एकेरी नाव घेत दुधवडकर यांनी सांगितले की, छगन भुजबळ गेले. नारायण राणे गेले आता हा एकोबा गेला आहे. आज उद्धव ठाकरे यांना पाठबळ देण्यासाठी झालेली शिवसैनिकांची गर्दी ही केवळ ‘शोरूम’ आहे. अजून आम्ही ‘गोडावून’ उघडलेले नाही. यापुढे मातोश्रीवरून जो आदेश येईल त्याचे पालन करा. असा संदेश यावेळी शिवसैनिकांना देण्यात आला. आता यापुढेही शिवसेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसैनिक तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवे 56 निवडून आणण्याची ताकद
शिवसेनेच्या या आंदोलनात खासदार मंडलिक यांनी भूमिका मांडताना म्हणाले की, कोणी दबावाने, कोणी अमिषाने कोणी गोड बोलण्याने गेला असेल तर त्यांनी विधानसभेत आल्यानंतर तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घ्यावा, तर मुरलीधर जाधव म्हणाले, 56 जरी गेले तरी नवे 56 निवडून आणण्याची ताकद शिवसेनेत आहे. गेलेले हे सर्वजण सुर्याजी पिसाळ यांची औलाद असल्याची जोरदार टीका बंडखोर आमदारांवर केली.