Ambadas Danve : शिवसैनिक म्हणवता मग पक्षप्रमुखांचा आदेश का मानत नाहीत? बंडखोर आमदारांना अंबादास दानवेंचा सवाल
या सगळ्या आमदारांनी कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. यावर तोडगा निघेल. एकनाथ शिंदे सांगत असलेला आकडा त्यांच्याकडे नाही, बरेचसे आमदार शिवसेनेसोबत आहेत, असे अंबादास दानवे म्हणाले.
मुंबई/औरंगाबाद : मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, शिवसेनेच्या विचाराला अपेक्षित मी काम करणार, जनतेने या सगळ्या लोकांना निवडून दिले आहे, हे लोक शिवसैनिक म्हणतात तर मग पक्षाप्रमुखाचा आदेश का मनात नाहीत, असा सवाल शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विचारला आहे. औरंगाबादमध्ये त्यांनी हा सवाल बंडखोर आमदारांना विचारला आहे. औरंगाबादेत शिवसेनेचे निषेध आंदोलन आहे. या आंदोलनासाठी शेकडो शिवसैनिक क्रांती चौकात दाखल झाले. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेचे राज्यातील हे पाहिलेच आंदोलन आहे. यावेळी अंबादास दानवे यांनी टीव्ही 9सोबत संवाद साधला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड आणि त्यात त्यांच्यासोबत गेलेले आमदार या विषयावर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
‘कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची चर्चा करा’
ते म्हणाले, की या सगळ्या आमदारांनी कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. यावर तोडगा निघेल. एकनाथ शिंदे सांगत असलेला आकडा त्यांच्याकडे नाही, बरेचसे आमदार शिवसेनेसोबत आहेत, असे अंबादास दानवे म्हणाले. 12 आमदारांना सध्या नोटीस देण्यात आली आहे. पक्षाविरोधात काही होत असेल तर कारवाई करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना आहे. तर आमदारांना दिलेल्या नोटिशीनंतर विधानसभा अध्यक्षांना असलेल्या अधिकाराद्वारे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, अशी माहिती दानवे यांनी दिली.
‘पक्षाच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात’
पक्षप्रमुख वारंवार सगळ्यांना सांगत आहेत. हे सांगत असताना अशा पद्धतीने भूमिका घेणे अत्यंत चुकीची आहे. पक्षाचा प्रमुख सांगतो, त्याप्रमाणे गटनेता, प्रतोद निवडला जातो. त्यामुळे मी सांगेल तेच, हे योग्य नाही, अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. तर बारा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय शिवसेनेसाठी नुकसान करणारा असला तरी पक्षाच्या हितासाठी असे कठोर निर्णय घ्यावे लागतात, असे ते यावेळी म्हणाले. पक्षप्रमुखांनी कोणत्याही आमदाराला डांबून, बांधून ठेवलेले नाही. सत्तेचा गैरवापर उद्धव ठाकरे करीत नाहीत, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.