मुंबईत पावसाच्या पार्श्वभूमीवर #RedAlert! ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड अलर्टचा नेमका अर्थ काय?
नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहावं, यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. मुंबई शहर, उपनगरांसह परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे
मुंबई : मुंबईत पावसाची तीव्रता वाढल्यामुळे (Mumbai Rains) प्रशासनाकडून मुंबई शहरासह उपनगरं, ठाणे, पालघरमध्ये रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहावं, यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. एकूण किती प्रकारचे अलर्ट जारी केले जातात, प्रत्येक अलर्टमागील नेमका अर्थ काय, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत सकाळी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे हवामान विभागाने मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी केला.
अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक संकटांच्या वेळी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो. आपत्तीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, येलो, ऑरेंज किंवा रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो.
रेड अलर्ट :
नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहावं, यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाणं टाळावं. रेड अलर्टच्या वेळी मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते.
ऑरेंज अलर्ट :
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, हे सूचित करण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून हा अलर्ट देण्यात येतो. मुंबईत पावसामुळे आपत्ती ओढावू शकते, हे सांगण्यासाठी सुरुवातीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.
गरज असेल आणि महत्त्वाचं काम असेल तर घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या, असंही या अलर्टमध्ये सांगितलं जातं. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केलेली असते.
येलो अलर्ट :
येत्या काही दिवसांमध्ये हवामानातील बदलामुळे नैसर्गिक संकट ओढवू शकतं, दैनंदिन कामं रखडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याच्या हेतून येलो अलर्ट जारी करण्यात येतो.
ग्रीन अलर्ट :
ग्रीन अलर्ट हा सर्वसामान्य परिस्थितीमध्ये असतो. याचा अर्थ कोणतंही संकट नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे.
येत्या 48 तासांत मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारी म्हणून मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.