राज्यात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा, कुठे काळाबाजार, तर कुठे मेडिकलबाहेर रांगा
सध्या कोरोनाच्या आजारावर प्रामुख्याने रेम्डेसिवीर इंजेक्शन हे औषध प्रभावी असल्याचे आढळून येत आहे. (Remdesivir injection Shortage)
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिव्हीरचा इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे बोललं जात आहे. गेल्या दोन दिवसात अनेक शहरात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे. (Remdesivir injection Shortage in all maharashtra due to black marketing)
राज्यात मुंबई, ठाणे, अंबरनाथ पुन्हा रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रुग्ण, डॉक्टर, हॉस्पिटलसह सरकारलाही या इंजेक्शनसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Shortage of Remdesivir in Maharashtra Mumbai, Thane, Ambernath… COVID Patients & Doctors, Hospitals ( including government) struggling to get it. Once again Black Marketing started @BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 7, 2021
राज्यात कुठे-कुठे रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा?
सोलापुरात रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत
सोलापुरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हुमा मेडिकल बाहेर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी रांग पाहायला मिळाली. रात्री 9 वाजल्यापासून अनेक रुग्णांचे नातेवाईक मेडिकल बाहेर रांगा लावून उभे आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत स्टॉक न आल्याने अनेकजण औषधांसाठी प्रतीक्षा करत होते. शासकीय रुग्णालयात जरी पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध असला तरी खासगी मेडिकलमध्ये मात्र अद्याप ही तुटवडा जाणवत आहे.
नंदुरबारमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा
नंदुरबार जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णाची संख्या आणि अपूर्ण आरोग्य सुविधेमुळे रुग्णांसह नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नंदूरबार जिल्ह्यातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. तसेच मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हीरचा तुटवडा आहे. मात्र राज्यसरकार आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक जिल्ह्यातील रुग्णांसाठी 1 हजार डोस उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती दिली आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी मोठ्या रांगा
नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.नाशिक जिल्ह्याच्या प्रमुख फार्मा बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे दुकान बंद तर दुसरीकडे फार्मा कंपन्यां बाहेर तुफान गर्दी अस चित्र बघायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात 5741 रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज आहे. सध्या या ठिकाणी फक्त 5820 उपलब्धता आहे.
उस्मानाबादेत परिस्थिती बिकट
उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. खासगी रुग्णालयात आणि औषधी दुकानातील साठा संपला आहे. उस्मानाबादमध्ये अनेक रुग्णांना इंजेक्शन मिळेना झाल्याने त्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. मात्र याबाबत अन्न आणि औषध प्रशासन तसेच प्रशासकीय यंत्रणा म्हणावी तशी कार्यान्वित झालेली दिसत नाही. अनेक गंभीर रुग्णांना आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. तर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक यांची मोठी धावपळ होत आहे.
लातुरात एकही डोस मिळेनासा
तसेच लातूर, सोलापूर जिल्ह्यातून देखील रेमडेसिव्हीर इंजेक्शन इंजेक्शन मिळेना झाले आहे. कोरोना झालेल्या एका रुग्णाला किमान 5 ते 6 डोस लागतात. मात्र एकही डोस मिळेनासा झाला आहे.
इंजेक्शनसाठी जास्त रक्कम देऊनही ते उपलब्ध नाही
जळगाव जिल्ह्यासह बुलडाणा, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तसेच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे. आज अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. तसेच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमेडिसेव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या इंजेक्शनसाठी जास्त रक्कम देऊनही ते उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
रेमडेसिव्हीर काय आहे?
राज्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव झाल्यापासून रेमडेसिव्हीर नावाचे एक इंजेक्शन वापरण्यात आरोग्य यंत्रणांनी सुरुवात केली. हे इंजेक्शन कोरोनावर प्रभावी ठरले आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोना संख्या आटोक्यात येण्यात मदत झाली आहे. कोविड-19 आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर केला जात आहे. सध्या कोरोनाच्या आजारावर प्रामुख्याने रेम्डेसिवीर इंजेक्शन हे औषध प्रभावी असल्याचे आढळून येत आहे.
रेमडेसिव्हीरची किंमत काय?
रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी या औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच घाऊक विक्रेत्यांना सुमारे 800 ते 1,300 रुपये करण्यात येत होती. म्हणजेच सरासरी 1,040/- रुपये या औषधाची किंमतीत याची विक्री होत होती. यानंतर कोरोना आजारावर प्रभावी पडणाऱ्या रेम्डेसिवीर इंजेक्शन दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
फेब्रुवारी, 2021 पासून रुग्णालये आणि रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली. पण छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नव्हती. त्यामुळे कमी किमतीचा लाभ रुग्णांना मिळत नव्हता. अनेक ग्राहकांकडून छापील किंमतीनुसार आकारणी केली जात नव्हती. त्यामुळे ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत होता. (Remdesivir injection Shortage in all maharashtra due to black marketing)